Site icon

नाशिक : जिल्हाधिकारी नव्या नियुक्तीच्या शोधात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवपदी अविनाश ढाकणे यांच्या नियुक्तीमुळे नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांची कोंडी झाली आहे. या जागेवर बदलीसाठी प्रयत्नशील असलेल्या गंगाथरन डी. यांच्यावर नव्याने घरोबा शोेधण्याची वेळ ओढावली आहे.

राज्यामध्ये प्रशासनातील खांदेपालट सुरूच आहे. शासनाने बुधवारी (दि.२८) एकमेव ढाकणे यांचे आदेश काढत त्यांची प्रदूषण नियंत्रण मंडळात नेमणूक केली. या आदेशासोबतच जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या अपेक्षांवर पाणी फेरल्याची चर्चा आहे. वास्तविक दोन महिन्यांपासून गंगाथरन डी. विनंती बदलीसाठी इच्छुक असून, वेळोवेळी त्यांनी तसे संकेत दिले. मुंबईत प्रदूषण मंडळात पोस्टिंगसाठी ते आग्रही होते. त्यासाठी शासन स्तरावर फिल्डिंगही लावल्याचे बोलले जात होते.

महसूल विभागात गंगाथरन डी. यांच्या बदलीवरून दररोज उलटसुलट चर्चा झडत आहेत. तसेच बदली आदेशासंदर्भात नवनवीन मुहूर्त काढण्यात येत होते. पण, दोन महिन्यांत राज्यातील २५ ते ३० आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करणाऱ्या शासनाने गंगाथरन डी. यांच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे ढाकणे यांची नियुक्ती होय. त्यामुळे गंगाथरन डी. यांच्यावर बदलीसाठी आता नव्याने जागेचा शोध घेण्याची वेळ ओढावली आहे.

आणखीन एक स्पर्धक बाहेर

नाशिकच्या जिल्हाधिकारीपदासाठी इच्छुक अधिकाऱ्यांची यादी भली मोठी आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या यादीतील एक एक नाव कमी झाले आहे. त्यामध्ये अविनाश ढाकणे यांचे ही नाव जोडले गेले आहे. त्यामुळे यादीमध्ये आता सोलापूरचे जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, धुळ्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि नंदुरबार जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे हे रेसमध्ये उरले आहेत.

हेही वाचा

The post नाशिक : जिल्हाधिकारी नव्या नियुक्तीच्या शोधात appeared first on पुढारी.

Exit mobile version