Site icon

नाशिक : पाच लाख द्या, अन्यथा बॉम्बने उडवून देऊ ; किराणा दुकानदाराला धमकी

सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

किराणा दुकानदाराकडे पाच लाख रुपये खंडणीची मागणी करीत पैसे न दिल्यास कुटुंबियास बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. एवढेच नव्हे तर बंदुकीने दुकानदार व त्याच्या पत्नीस मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि.3) रात्री 10 च्या सुमारास तालुक्यातील गुळवंच येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघा संशयितांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे.

गुळवंच येथे चंद्रकांत विठ्ठल आंबेकर (56) यांचे किराणा दुकान आहे. रात्री 10 वाजेच्या सुमारास गावातीलच विष्णू एकनाथ भाबड व बबन मल्हारी भाबड हे दोघे आंबेकर यांच्या दुकानात गेले. संशयित विष्णू भाबड यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी आंबेकर यांच्याकडे खताच्या गोण्या उधारीवर मागितल्या होत्या. तेव्हा भाबड याने आंबेकर यांना शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली होती. सोमवारी रात्री आंबेकर हे किराणा दुकानाच्या पायरीवर बसलेले असताना संशयित भाबड याने आंबेकर यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दुकानात जावून चंद्रकांत आंबेकर यांना बंदुकीने डोळ्यावर व त्यांच्या पत्नीला डोक्यावर मारहाण केली. सोबत असलेल्या स्टीलच्या डब्यातील बॉम्ब सदृश्य वस्तूचा धाक दाखवून पाच लाख रुपये खंडणीची मागणी केली. पाच लाख रुपये न दिल्यास आंबेकर कुटुंबियांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

सदर डब्यात गावठी पेट्रोल बॉम्ब व सुतळी बॉम्ब असल्याचे समजते. भयभीत झालेल्या आंबेकर कुटुंबियांनी तातडीने पोलिसांना संपर्क साधला. पोलिसांच्या भीतीने धमकी देणार्‍याने पोबारा केला. पोलीस निरीक्षक श्यामराव निकम, सहाय्यक निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाळू लोंढे, हवालदार भगवान शिंदे, विनोद जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत बॉम्बची खात्री केली. दरम्यान, बबन भाबड याला पोलिसांनी अटक केली आहे. सहाय्यक निरीक्षक पवार करीत पुढील तपास आहेत.

भाबडने बॉम्ब आणला कोठून?

एमआयडीसी पोलिसांनी तातडीने मालेगाव येथून बॉम्ब शोधक पथकाला पाचारण केले. तोपर्यंत पोलीस पथक मंगळवारी (दि. 4) पहाटे सहा वाजेपर्यंत घटनास्थळी थांबून होते. पहाटे सहा वाजता मालेगाव येथील बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही बॉम्ब निकामी केल्यानंतर पोलिस मुख्य संशियत विष्णू एकनाथ भाबड याचा शोध घेत होते. भाबड याने या प्रकारानंतर घरी जाऊन झोपेच्या गोळ्या घेतल्याचे समजते. भाबड याने स्वत: बॉम्ब बनवला की दुसर्‍या कुणाकडून बनवून घेतला याबाबत पोलीस तपास करीत आहेत.

पोलीस अधीक्षकांची घटनास्थळी भेट

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अप्पर अधीक्षक माधुरी कांगणे यांनी गुळवंच येथे भेट देऊन पाहणी केली. त्यांनी तपासकामी एमआयडीसी पोलिसांना सूचना केल्या आहेत.

हेही वाचा : 

The post नाशिक : पाच लाख द्या, अन्यथा बॉम्बने उडवून देऊ ; किराणा दुकानदाराला धमकी appeared first on पुढारी.

Exit mobile version