Site icon

नाशिक : ब्रॅंडेडच्या नावे बनावट कपड्यांची विक्री, दुकानचालकाविरोधात गुन्हा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

ब्रॅंडेड कंपन्याचे मोबाइलचे बनावट साहित्य विक्री करणाऱ्या दोघा विक्रेत्यांवर कारवाई केल्याची घटना ताजी असतानाच आता ब्रँडेड कंपन्याच्या नावे बनावट कपडे विक्री करणाऱ्या दुकानचालकाविरोधात कारवाई करण्यात आली आहे. ब्रँडेडच्या नावे बनावट कपड्यांचा साठा करुन कंपनीचे नाव वापरल्याबद्दल हुंडिवाला लेनमधील दुकानात कारवाई करण्यात आली आहे.

विक्रेत्याकडून १४ हजारांचा बनावट कपड्यांचा माल जप्त करून व्यावसायिक किशोर खियलदास लालवाणी (रा. होलाराम कॉलनी) यांच्याविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात प्रकाशन हक्क (कॉपीराइट) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भद्रकाली पोलिसांकडे राकेश राम सावंत (रा. मुंबई) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावंत हे एका कपड्यांच्या कंपनीत फील्ड ऑफिसर असून बनावट कपडे विक्री करणाऱ्यांवर कारवाई करत असतात. त्यानुसार नाशिकच्या कानडे मारुती लेनमध्ये एका दुकानात कंपनीच्या नावे बनावट कपडे विक्री होत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार सावंत यांनी महादेव होजिअरी दुकानात कपड्यांची पाहणी केल्यावर गुन्हे उपायुक्त प्रशांत बच्छाव व उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांना माहिती दिली. त्यानुसार, भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी एक पथक सावंत यांच्यासोबत दुकानात पाठवले. तिथे पथकाने तपासणी करुन मुद्देमाल जप्त केला. त्यामध्ये चार हजार आठशे रुपयांच्या स्पोर्ट पॅन्टसहित तीन हजार सहाशे रुपयांच्या नाइट पॅन्ट आणि पाच हजार सहाशे पंचवीस रुपयांच्या दुसऱ्या रंगातील नाइट पॅन्टचा समावेश आहे. काही कपडे परीक्षणासाठी कंपनीकडे देण्यात आले आहेत. याप्रकरणी उपनिरीक्षक दिपक पटारे हे पुढील तपास करीत आहेत.

बनावट मालामुळे ग्राहकांना गंडा

याआधीही शहरात कारवाई करीत बनावट माल विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली आहे. सरकारवाडा पोलिसांनी एप्रिल महिन्यात प्रधान पार्क येथील दोघा विक्रेत्यांवर कारवाई करीत त्यांच्याकडून २ लाख ८८ हजार रुपयांचे बनावट साहित्य जप्त केले होते. त्यामुळे ग्राहकांची आर्थिक फसवणूक होत असल्याचे उघड झाले होते.

हेही वाचा : 

The post नाशिक : ब्रॅंडेडच्या नावे बनावट कपड्यांची विक्री, दुकानचालकाविरोधात गुन्हा appeared first on पुढारी.

Exit mobile version