Site icon

पंचवटी कारंजा येथे बहुप्रतीक्षित शिवपुतळा उभारणीच्या कामाचे भूमिपूजन

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
पंचवटी कारंजा येथील पूर्णाकृती छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कमी उंचीचा व जुना झाल्याने या ठिकाणी भव्य पुतळा उभारून नव्याने शिवस्मारक उभारण्याची अनेक वर्षांपासून मागणी केली जात होती. अखेर बहुप्रतीक्षित नवीन अश्वारूढ शिवपुतळा उभारणीच्या कामाचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शिवप्रेमींसह पंचवटी शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या पुतळा उभारणीच्या कामासाठी सुमारे १ कोटी ३५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अश्वारूढ पुतळा ख्यातनाम शिल्पकार श्रीराम सुतार यांनी घडविला आहे. धुळे या मूळ गावाचे श्रीराम सुतार यांनी गुजरात येथील प्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार पटेल यांचा पुतळादेखील उभारलेला आहे. पंचवटी कारंजा येथे बसविण्यात येणारा हा अश्वारूढ पुतळा माजी नगरसेवक गुरमित बग्गा, विमल पाटील आणि नंदिनी बोडके यांच्या निधीतून साकारण्यात येणार असून, पंचवटीतील सर्व लोकप्रतिनिधी नागरिक व पंचवटी शिवजन्मोत्सव समितीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे काम पूर्णत्वास येणार आहे. याप्रसंगी आमदार राहुल ढिकले, ज्येष्ठ नेते सुनील बागूल, माजी नगरसेवक गुरमित बग्गा, विमल पाटील, नंदिनी बोडके, नरेश पाटील, खंडू बोडके, माजी नगरसेवक रुची कुंभारकर, हेमंत शेट्टी, किरण सोनवणे, पंचवटी शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष गौरव गोवर्धने आदी उपस्थित होते.

असा असणार शिवरायांचा पुतळा
सध्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढून त्या जागी नवीन अश्वारूढ पुतळा बसवण्यात येणार आहे. हा पुतळा हा १२ फूट उंच चौथर्‍यावर उभारण्यात येणार असून, पुतळ्याची उंची साधारण १४ फूट असणार आहे. या शिवस्मारकाची एकूण उंची ११ मीटर असून, पंचवटी कारंजावर ग्रॅनाइट मार्बल बसवण्यात येणार आहे. गोलाकार असलेल्या या कारंजात उद्यान, लाईट व्यवस्थादेखील करण्यात येणार आहे.

The post पंचवटी कारंजा येथे बहुप्रतीक्षित शिवपुतळा उभारणीच्या कामाचे भूमिपूजन appeared first on पुढारी.

Exit mobile version