Site icon

प्रशिक्षक अनिल निगळ यांच्या परिश्रमाने ‘विशेष’ मुलांच्या पंखांना बळ

नाशिक : आनंद बोरा

नाशिक येथील वीर सावरकर जलतरण तलाव.. वेळ सायंकाळची… शहरातील काही मुले या तलावावर सर्वांचे लक्ष वेधून घेतात. चक्क वीस फूट पाण्यात सरसर पोहणारी ही ‘विशेष’ मुले आता जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी तयार आहेत. ‘ऑटिझम’ (Autism) असलेली ही मुले इतर मुलांपासून थोडी वेगळी आहेत. हा आजार नसून एक कमतरता आहे. ती कोणालाही होऊ शकते. 110 मुलांमागे एक मुलाला ‘ऑटिझम’शी (Autism) संबधीत असतो.

सामान्य मुलापेक्षा 2 टक्के कमी आकलन शक्ती या मुलांमध्ये असते. या मुलांना नेहमी कोणाच्या तरी आधाराची गरज असते. ही मुले सामान्य आणि गतिमंद मुलांच्या मधल्या गटातील असतात. या मुलांना शाळेत विविध थेरपी शिकविल्या जातात. ज्यामध्ये स्पीच, डान्स, योगा शिकविले जाते. पण या मुलांच्या विकासासाठी स्विमिंग आवश्यक असल्याचे डॉक्टरांकडून समजल्यावर या मुलांच्या पालकांनी शहरातील विविध जलतरण तलाव पालथे घातले. पण, त्यांना कोणीही प्रवेश देण्यास तयार नव्हते. कारण जलतरण तलावाच्या नियमात ही मुले बसत नव्हती. महापलिकेच्या वीर सावरकर जलतरण तलाव येथे आल्यानंतर येथील मुख्य व्यवस्थापिका शिल्पा देशमुख यांना ते भेटले आणि त्यांनी लागलीच त्यांना परवानगी दिली. पण त्यांना शिकविणार कोण, असा प्रश्न उपस्थित झाला. येथील प्रशिक्षक अनिल निगळ यांनी ही मोठी जबाबदारी स्वीकारली आणि रोज ते या मुलांना प्रशिक्षण देऊ लागले. त्यांच्याशी संवाद साधू लागले. पाण्याला घाबरणाऱ्या या मुलांची आता पाण्याशी दोस्ती झाली आहे. इतकंच काय तर ते जिल्हास्तरीय जलतरण स्पर्ध्येसाठीदेखील तयार झाले आहेत. खुशांत पवार, प्रज्ञा देशमुख, कार्तिक आहेर, अंबज्ञ पाटील, अधिराज देशमुख, गार्गी कुवर, आदित्य वाघ, विनय सूर्यवंशी ही ९ ते १३ वयोगटातील मुले रोज संध्याकाळी स्विमिंगला येतात. आल्यावर एक्सरसाईज करणे, नंतर स्विमिंगचे विविध प्रकार शिकत ते आपल्यातील अनोख्या गुणांचे प्रदर्शन दाखवतात. स्विमिंगमुळे या मुलांचे मसल पक्के होत असून, स्टॅमिना वाढून प्रतिकारशक्तीदेखील वाढत आहे. तसेच डेव्हलपमेंट फास्ट होण्यास मदत होत आहे. प्रशिक्षक अनिल निगळ यांना जलतरण तलावामधील सहकारी संजय पाटील, दशरथ दिघे, कुंदन दळे, नितीन निकुंभ, जितेंद्र चव्हाण, आशुतोष मोहिते यांचे सहकार्य मिळत आहे. (Autism)

स्विमिंगमुळे मुलांची हायपरॲक्टिव्हिटी कमी होण्यास मदत होते. तसेच संवेदना कमी होण्यास मदत होते. फोकस आणि कॉन्सन्ट्रेशनमध्ये वाढ होते. प्रतिकारशक्ती वाढते. पाच वर्षांवरील मुलांनी स्विमिंग करण्यास हरकत नाही. पण डॉक्टरांच्या सल्ल्याने ते करावे. स्विमिंगबरोबर डान्स केल्याने त्यांना लाभदायी असते. – डॉ. उमा बच्छाव, विशेषज्ज्ञ.

स्पेशल मुलांसाठी आम्ही पोहण्याचे प्रशिक्षण देत असून, आमचे प्रशिक्षक अनिल निगळ व सहकारी त्यांना योग्य मार्गदर्शन देऊन शिकवितात. शहरात स्पेशल मुलांना पोहणे शिकायचे असेल त्यांच्या पालकांनी जलतरण तलाव कार्यालयाशी संपर्क साधावा. – शिल्पा देशमुख, व्यवस्थापक, वीर सावरकर जलतरण तलाव, नाशिक.

आठ महिन्यांपासून माझा मुलगा या तलावावर स्विमिंगसाठी येतो. अनिल निगळ यांनी त्याला पोहण्यास शिकविले. पोहणे सुरू केल्यानंतर त्याच्यात अनेक बदल दिसून आले. वेगवेगळ्या थेरपी आणि स्पीच संवादाला तो आता योग्य प्रतिसाद देत आहे. – विमल पास्ते, पालक.

अनेक वर्षांपासून मी स्पेशल मुलांना प्रशिक्षण देत आहे. चाळीस मुलांना स्विमिंग शिकविले आहे. अनेक मुलांची सागरी स्पर्धेसाठी निवड झाली होती. आता बारा मुले स्विमिंगसाठी येतात. त्यामुळे त्यांचे आरोग्य उत्तम होत आहे. – अनिल निगळ, प्रशिक्षक.

ऑटिझम आहे तरी काय? (Autism)
हा आजार नसून एक कमतरता आहे. 110 मुलांमागे एक मुलाला हा आजार होतो. सामान्य मुलापेक्षा 2 टक्के कमी आकलनशक्ती असते. या मुलांच्या सर्व सदस्यांना प्रथम ट्रेनिंग घ्यावे लागते व त्याच पद्धतीने संवाद साधून बोलावे लागते. हा आजार लवकर लक्षात आल्यास त्याच्यावर योग्य उपचार करता येतात.


नाशिक : पालकांसमवेत प्रशिक्षणार्थी मुले. (छाया : आनंद बोरा)

The post प्रशिक्षक अनिल निगळ यांच्या परिश्रमाने 'विशेष' मुलांच्या पंखांना बळ appeared first on पुढारी.

Exit mobile version