Site icon

महाबोधिवृक्ष अनुराधापुरा-नाशिकमधील संवाद सेतू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; सुमारे २३०० वर्षांची परंपरा लाभलेला महाबोधिवृक्ष मानवी बंधुत्वाचे प्रतीक आहे. बोधिवृक्ष प्रेम, आदर, मैत्री अन् शांततेचा संदेश देत असल्याने त्यातून मानव कल्याण साध्य होणार आहे. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे श्रीलंकेतील अनुराधापुरा आणि भारतातील नाशिक या दोघांना जोडणारा तो संवाद सेतू ठरेल, असा आशावाद श्रीलंकेचे धार्मिक आणि सांस्कृतिक मंत्री विदुर विक्रमनायके यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्ट, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सम्राट अशोक विजयादशमीनिमित्त त्रिरश्मी लेणीच्या पायथ्याशी असलेल्या बुद्धस्मारक परिसरात महाबोधिवृक्षाच्या रोपण सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, स्वागताध्यक्ष मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, आ. डॉ. राहुल आहेर, आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, माजी खा. समीर भुजबळ, माजी आ. पंकज भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, आनंद सोनवणे, रिपाइंचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे, मुख्य संयोजक भन्ते सुगत थेरो, मुख्य निमंत्रक भिक्खू संघरत्न थेरो यांच्यासह श्रीलंका, मलेशिया, थायलंड, कंबोडिया येथील बौद्ध भिक्खू उपस्थित होते. मंत्री विदू विक्रम नायका म्हणाले, २३०० वर्षांपूर्वी महाबोधिवृक्षाची फांदी भारतातून श्रीलंकेत नेली आणि आज पुन्हा ती भारतात आणली याचा मला अभिमान वाटतो. ज्या वृक्षाच्या फांदीचे रोपण केले गेले, ती भविष्यासाठी मोठी बाब असणार आहे. ही एक ऐतिहासिक घटना असून, त्याचे आपण सर्व साक्षीदार होत आहोत. खरं तर बुद्धवाद ही जगण्याची कला आहे. बोधिवृक्ष शांतता आणि प्रेमाचे प्रतीक असल्याने आपणा सर्वांच्या जगण्याला तो आणखी सुसह्य करेल. त्यामुळे बोधिवृक्ष श्रीलंकेतून भारतात आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्यांचे मी आभार मानतो, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. सीमा पेटकर, शलाका बेंद्रे यांनी सूत्रसंचालन केले, तर मुख्य निमंत्रक भिक्खू संघरत्न थेरो यांनी आभार मानले.

श्रीलंकेतील बुद्धमूर्ती भेट

महाबोधिवृक्षाची फांदी नाशिकमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मंत्री छगन भुजबळ, गिरीश महाजन व डॉ. भारती पवार यांना श्रीलंकेचे मंत्री विदू विक्रम नायका यांनी श्रीलंकेतील बुद्ध मूर्ती भेट दिल्या. यावेळी त्यांनी या सर्वांचे आभारही मानले.

हेही वाचा :

The post महाबोधिवृक्ष अनुराधापुरा-नाशिकमधील संवाद सेतू appeared first on पुढारी.

Exit mobile version