Site icon

मोदींच्या नाशिक दौऱ्याच्या खर्चाचा आलेख वाढताच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला दीड महिन्यांचा कालावधी उलटला, तरी या दौऱ्याच्या खर्चाचा आलेख वाढताच राहिला आहे. दौऱ्यानिमित्त महापालिकेच्या माध्यमातून शहरात रस्ते डांबरीकरण, सजावटीसह केलेल्या सुमारे ३० कोटींच्या कामांना गेल्या महिन्यात मंजुरी दिल्यानंतरही कामांची देयके एकामागून एक सुरूच आहेत. पुतळ्यांच्या रंगरंगोटीवर 10 लाख रुपयांचा खर्च झाला असून, यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या गुरुवारी (दि. २९) होत असलेल्या सभा पटलावर मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. (PM Modi Nashik Daura)

पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय युवा महोत्सवानिमित्त १२ जानेवारीला नाशिक दौऱ्यावर आले होते. त्यांच्या स्वागतासाठी अवघे नाशिक शहर सजविण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांच्या आदेशांनंतर महापालिका प्रशासनाने शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, गरज असेल तेथे डांबरीकरण करणे, थर्मल पेंट, स्वच्छतागृहांची साफसफाई-रंगरंगोटी, गोदा घाटाची स्वच्छता-रंगरंगोटी, विद्युत रोषणाई आदी कामे अवघ्या दोनच दिवसांत पूर्ण केली. यासंदर्भातील सुमारे ३० कोटी रुपये खर्चाचा बांधकाम विभागाचा प्रस्ताव फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात स्थायी समितीच्या पटलावर मंजूर करण्यात आला होता. यातील पंचवटी विभागातील कामांवरच सुमारे २० कोटींचा खर्च करण्यात आला होता. मात्र बांधकाम विभागापाठोपाठ आता अन्य विभागांची देयकेही समोर येत आहेत. मोदी दौऱ्याच्या काळात शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांची रंगरंगोटी करण्यात आली होती. त्या संदर्भातील १० लाखांच्या खर्चाला कार्योत्तर मंजुरीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. (PM Modi Nashik Daura)

ड्रेनेज लाइन दुरुस्तीही लाखोंत

पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा तपोवनातील हनुमाननगर येथील खासगी मालकीच्या जागेत झाली होती. या कार्यक्रमानिमित्त परिसरातील ड्रेनेज दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले होते. त्यावरही ११.८१ लाखांचा खर्च झाला असून, यासंदर्भातील कार्योत्तर मंजुरीचा प्रस्तावही स्थायीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे.

हेही वाचा :

The post मोदींच्या नाशिक दौऱ्याच्या खर्चाचा आलेख वाढताच appeared first on पुढारी.

Exit mobile version