Site icon

युनीट-२ ची यशस्वी कामगिरी; अनधिकृत गांजा जप्त करून चौघांना अटक

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
पुण्यातील पिंट्याभाईच्या व्हायरल व्हिडीओमुळे तरुणाईमध्ये अमली पदार्थाचे व्यसन कसे फोफावत चालले आहे याचा प्रत्यय आला. या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून अमली पदार्थ सप्लाय होणाऱ्या अवैध वाहतुकीवर पोलीसांनी करडी नजर ठेवली आहे. सिडको परिसरातील स्प्लेंडर हॉल येथून गुन्हे शाखा युनिट दोनच्या वतीने दीड किलो पेक्षा जास्त गांजा घेऊन जाणाऱ्या चार संशयीतांना मुद्देमालसह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार (दि.११) रोजी एका सँट्रो गाडीतून अनधिकृत गांजा नेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार स्वप्नील जुंद्रे यांना गुप्त बातमीदाराकडून मिळाली. त्यानुसार सोमवारी (दि.११) दुपारच्या सुमारास चार इसम लाल रंगाच्या सॅन्ट्रो चारचाकी (क्रमांक एमएच १४ एई ४३१७) यावरून नाशिक शहरातील व्दारका उड्डाण पुलावरून मुंबई हायवे दिशेने अंमली पदार्थ घेवून जाणार असल्याची खात्रीशीर माहीती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा, युनिट-दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही. डी. श्रीमनवार यांनी व्दारका उड्डाणपुल ते पाथर्डीफाटा दरम्यान सापळा रचला. लाल रंगाची सॅन्ट्रो चारचाकी वाहनास स्प्लेंडर हॉल समोर  थांबवून वाहनातील संशयित चेतन दिपक पाटील (वय २० वर्षे), पवन अशोक पाटील, (वय २१ वर्षे), प्रशांत गुलाबराव पाटील, (वय २९ वर्षे), निलेश विश्वास पाटील, (वय २६ वर्षे, सर्व राहणार डोली ता. पारोळा, जि. जळगाव) या चौघांच्या ताब्यातून एकुण अठरा हजार रू. किंमतीचा १६५१ ग्रॅम वजनाचा गांजा तसेच १,००,००० रू. सॅन्ट्रो चारचाकी वाहन,  तीस हजार रू. चे मोबाईल फोन असा एकुण १,४८,००० रू किंचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव, हेमंत नागरे, पोलीस हवालदार मनोहर शिंदे, संजय सानप, प्रकाश महाजन, सुनिल आहेर, चंद्रकांत गवळी, स्वप्नील जुंद्रे, समाधान वाजे, विशाल कुवर, महेश खांडबहाले, तेजस मते, दशरथ निंबाळकर, मधुकर साबळे, समाधान वाजे, विशाल कुवर, महेश खांडबहाले, रोहित आहिरे, जितेंद्र वजिरे आदींनी ही यशस्वी कामगिरी पार पाडली.

The post युनीट-२ ची यशस्वी कामगिरी; अनधिकृत गांजा जप्त करून चौघांना अटक appeared first on पुढारी.

Exit mobile version