Site icon

राऊतांनी चुकीचे वक्तव्य केल्यास न्यायालयात दाद मागू ! दादा भुसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- बेताल वक्तव्ये करणे हा जणू संजय राऊत यांचा जन्मसिध्द अधिकार आहे. पण आता त्यांनी चुकीचे वक्तव्य केल्यास आपण न्यायालयात दाद मागू, अशा शब्दांत पालकमंत्री दादा भुसे यांनी ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

मंत्री भुसे यांनी खा. राऊत यांच्याविरोधात अब्रु नुकसानीचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणी न्यायालयाने राऊत यांना समन्स बजावला असून जामिनासाठी ते शनिवारी(दि.२) मालेगाव न्यायालयात हजर राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर माध्यमांनी भुसे यांना विचारला असता त्यांनी राऊत यांच्यावर टीकास्त्र डागले. ते म्हणाले की, राऊत यांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत. त्याचे उत्तर मी सभागृहात दिले होते. राऊत यांनी केलेल्या बदनामीविरोधात मालेगाव न्यायालयात मी त्यांच्याविरोधात अब्रु नुकसानीचा दावा देखील दाखल केला आहे. राऊत त्या दाव्याच्या जामिनीसाठीच नाशिकमध्ये आले आहेत. उद्या ते न्यायालयासमोर हजर होणार आहेत. मात्र त्यांना बोलून काही फायदा नाही. दररोज काही ना काही वक्तव्य करणे हा जणू आपला जन्मसिध्द अधिकारच असल्याचे ते समजतात. पण आता जर त्यांनी काही चुकीचे वक्तव्य केले तर आम्ही न्यायालयात दाद मागू, अशी भूमिका भुसे यांनी व्यक्त केली.

सरसकट सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मागणीवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. भुसे म्हणाले की सरसगट सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा विषय बोलायला चांगला वाटतो परंतू आर्थिक बाबींचे सोंग कोणतेही सरकार असले तरी ते आणू शकत नाही. जयंत पाटील यांनी वित्तमंत्री पदासह अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांना याची माहिती आहे, असे नमूद करत शेतकरी मदत प्रकरणी कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आहे. पंचनाम्यांचे काम प्रगतीपथावर आहे, अशी माहितीही भुसे यांनी यावेळी दिली.

हेही वाचा :

The post राऊतांनी चुकीचे वक्तव्य केल्यास न्यायालयात दाद मागू ! दादा भुसे appeared first on पुढारी.

Exit mobile version