Site icon

राज्यपाल दौऱ्याचे सूत्रबद्ध नियोजन करावे : जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राज्यपाल रमेश बैस शुक्रवारी (दि. 5) नाशिक जिल्हा दौरा प्रस्तावित आहे. त्या अनुषंगाने सर्व शासकीय यंत्रणांनी राजशिष्टाचाराचे पालन करून सूत्रबद्ध नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात राज्यपाल बैस यांचा संदीप विद्यापीठ येथील प्रस्तावित दौरा कार्यक्रमाबाबत पूर्वतयारी आढावा बैठकीत शर्मा बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, सहायक जिल्हाधिकारी जितीन रहमान, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपविभागीय अधिकारी हेमांगी पाटील, रवींद्र ठाकरे, अप्पासाहेब शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

शर्मा म्हणाले, दौरा अनुषंगाने नियोजित हेलिपॅड, दौरा ठिकाणी सुरक्षाव्यवस्था चोख ठेवण्यात यावी. वाहतूक व्यवस्थेचेही सुयोग्य नियोजन करण्यात यावे. त्याचप्रमाणे ताफ्यातील वाहने यांची प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून तपासणी करून ती सुस्थितीत असल्याची खात्री करावी. संदीप विद्यापीठ या ठिकाणी राज्यपाल महोदय यांची भेट प्रस्तावित आहे. त्या अनुषंगाने या ठिकाणीही आनुषंगिक सुरक्षा व इतर बाबींच्या व्यवस्थेबाबत संबंधित यंत्रणांनी काटेकोर नियोजन करण्याबाबत सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

The post राज्यपाल दौऱ्याचे सूत्रबद्ध नियोजन करावे : जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना appeared first on पुढारी.

Exit mobile version