Site icon

व्यापारी, माथाडी कामगारांच्या बैठकीत ताेडगा नाहीच, शेतकऱ्यांना मोठा फटका

मनमाड : पुढारी वृत्तसेवा
शेतकऱ्यांच्या हिशेबपट्टीतून हमाली, तोलाई वरून कांदा व्यापारी आणि माथाडी कामगारांमध्ये वाद निर्माण झाला आहे. याबाबत बुधवारी (दि. ३) बाजार समितीमध्ये आयोजित बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने गुरुवार (दि. ४) पासून बाजार समितीतील कांदा, धान्य लिलाव बेमुदत बंद ठेवण्यात आले आहेत. मार्चअखेरच्या हिशेबासाठी चार दिवसांपासून बाजार समितीतील लिलाव बंद ठेवण्यात आले हाेते. त्यामुळे गुरुवारपासून बाजार समितीतील लिलाव सुरळीत होतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, व्यापारी आणि माथाडी कामगारांच्या वादामुळे पुन्हा बाजार समितीत लिलाव बंद झाल्यामुळे त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

शेतकरी बाजार समितीत कांदा, धान्य आणि इतर शेतमाल लिलावासाठी घेऊन आल्यानंतर त्याची तोलाई, मापारी करत असे. त्या मोबदल्यात व्यापारी शेतकऱ्यांकडून हमाली, तोलाईची कपात करून ती रक्कम माथाडी कामगारांना देत होते. मात्र, आता व्यापाऱ्यांनी ही रक्कम कपात करण्यास नकार दिला आहे. व्यापाऱ्यांच्या म्हण‌ण्यानुसार शेतकरी तोलाई, मापारी शुल्क देण्यास तयार नाहीत. सध्या जवळपास सर्वच ट्रॅक्टर हायड्रोलिक असून वजनकाटादेखील त्याच पद्धतीने केला जातो. त्यामुळे हमाली तोलाईचे शुल्क आम्ही का भरावे असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित करत हे शुल्क भरण्यास नकार दिला आहे. तर मापारींच्या म्हणण्यानुसार आम्ही आजही तोलाई आणि मापारीचे काम करीत असून, शासनाच्या नियमानुसार आम्हाला हे शुल्क दिले जात आहे. या मुद्द्यावरून व्यापारी आणि माथाडी यांच्यामध्ये वाद निर्माण झाला असून, जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत लिलावात सहभागी होणार नसल्याचा निर्णय दोन्ही घटकांनी घेतल्यामुळे बाजार समितीत लिलाव ठप्प झाले आहेत.

शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार
अगोदरच कांद्याला भाव नाही, त्यात तापमानामध्ये मोठी वाढ होत असल्याने त्याचा परिणाम चाळीत साठवलेल्या कांद्यावर होत असून, त्यांचे खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. वारंवार या-ना त्या कारणाने लिलाव बंद ठेवून नेहमी आम्हाला वेठीस धरले जाते. हा सर्व प्रकार आता सहन करण्याच्या पलीकडे गेला असल्याचा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त करून पणन मंडळ, सहकार विभाग याबाबत काही ठोस निर्णय घेणार आहे की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा:

The post व्यापारी, माथाडी कामगारांच्या बैठकीत ताेडगा नाहीच, शेतकऱ्यांना मोठा फटका appeared first on पुढारी.

Exit mobile version