Site icon

शॉट सर्किटमुळे 40 हजार रुपयांचा जनावरांचा चारा खाक

नाशिक (देवळा) : वाजगाव ता. देवळा येथे रविवारी (दि.७ ) रोजी सकाळी १० वाजता विजेच्या शॉट सर्किटमुळे जवळपास तीस ट्रॉली गुरांचा चारा जळून खाक झाला आहे. त्यामुळे सुमारे शेतकऱ्याचे चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्याला धीर दिला असून नुकसानभरपाई मिळून देण्याचे आश्वासन दिले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वाजगाव ता. देवळा येथील शेतकरी अमोल देवरे यांनी आपल्या शेतात गुरांसाठी जवळपास तीस ट्रॉली मक्याचा चारा रचून ठेवला होता. या चाऱ्यालगत आदिवासी वस्ती आहे. रविवारी (दि.७ ) रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास ह्या चाऱ्याला शॉट सर्किटमुळे अचानक आग लागली. जवळपास राहण्याऱ्या लोकांच्या ही घटना लक्षात येताच त्यांनी चारा मालक अमोल देवरे यांना कळवले. घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत चारा विझविण्यासाठी प्रयत्न केला. मात्र उन्हाच्या तीव्रतेने आगीने रौद्ररूप धारण केले होते. आग विझविण्यासाठी देवळा नगरपंचायतीच्या अग्निशमन वाहनाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी परिश्रम घेतले. आग लागल्याने चाऱ्या शेजारी राहणाऱ्या आदिवासी नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. मात्र वेळीच अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणल्याने त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. याकामी वडाळा येथील अरुण पवार यांनी घटनास्थळी तत्काळ पाण्याचा टँकर पाठवून आग विझविण्यासाठी मोठी मदत केली. यामध्ये कुठल्याही प्रकारची जिवीत हानी झाली नसून, देवरे यांचे जवळपास 40 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तलाठी धोंडगे यांनी घटनास्थळी कोतवालला पाठवून माहिती घेत सोमवारी (दि.८) रोजी पंचनामा केला जाणार आहे. अशी माहिती देवरे यांनी दिली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच आमदार डॉ. राहुल आहेर यांनी भेट देत नुकसानीची पहाणी केली आहे. यावेळी ग्रामस्थ देखील उपस्थित होते.

हेही वाचा:

The post शॉट सर्किटमुळे 40 हजार रुपयांचा जनावरांचा चारा खाक appeared first on पुढारी.

Exit mobile version