Site icon

श्रीरामाच्या जयघोषात गोदावरी उगम ते संगम परिक्रमेस प्रारंभ

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा- साधू, संत, महंत यांच्या गोदावरी परिक्रमेस रविवारी (दि. ३) त्र्यंबेकश्वर येथून सकाळी विधिवत पूजा अर्चा करून प्रारंभ झाला. या यात्रेचे आगमन सकाळी 10.30 वाजता पंचवटीतील पंचमुखी हनुमान मंदिरात होताच रामनामाचा जयघोष, फुलांची उधळण व पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले. यानिमित्त रामकुंडावर साधू, महंतांच्या उपस्थितीत गोदापूजन व आरती करण्यात आली. यानंतर दुपारी 12 च्या सुमारास ही यात्रा पुढे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराच्या दिशेने रवाना झाली.

वैष्णव संप्रदायात प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने साधू, संत आणि महंत गोदावरी नदी उगम ते संगम परिक्रमेसाठी निघाले आहेत. या परिक्रमेचे आयोजन श्री टिलाद्वारा गाद्याचार्य मंगलपीठाधीश्वर श्री श्री १००८ श्री महंत माधवाचार्य महाराज यांनी केलेले असून, यात भारतभरातून अयोध्या, जगन्नाथपुरी, वृंदावन, चित्रकूट यांसह नाशिकमधील 300 हून अधिक साधू, संत व महंत सहभागी झाले आहेत. रविवारी (दि. ३) त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन, अभिषेक व पूजन करून पवित्र कुशावर्त तीर्थावर गोदावरी नदीपूजन व संकल्प करण्यात आला. त्यानंतर ब्रह्मगिरी, गंगाद्वार दर्शन, संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यांचे समाधी दर्शन घेऊन परिक्रमा यात्रेला प्रारंभ झाला. सकाळी ८ वाजता गिरणारे येथील बालाजी मंदिरात यात्रेत सहभागी साधूंचे संतपूजन करण्यात आले. त्यानंतर सकाळी 10.30 वाजता जुना आडगाव नाका येथील प्राचीन पंचमुखी हनुमान मंदिरात पंचमुखी हनुमान मंदिर भक्त परिवारातर्फे यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले.

यानंतर रामकुंडावर श्री महंत माधवाचार्य, महंत रामकृष्णदास महाराज, महंत प्रजामोहनदास महाराज, महंत सीतारामदास महाराज, महंत भक्तिचरणदास महाराज, महामंडलेश्वर संविदानंद सरस्वती, महंत रामप्रवेशदास महाराज, महंत हरिओमदास महाराज, महंत जगदीशदास महाराज, महंत काशीदास महाराज, महंत पूर्णचंद्रदास महाराज, महंत महावीरदास महाराज, महंत देवकीनंदनदास महाराज, महंत हरिदास महाराज, महंत सीतारामदास महाराज, महंत गोपालदास महाराज, महंत पायगुरुदास महाराज, महंत कृपासिंधुदास महाराज आदी साधू, महंतांच्या उपस्थितीत गोदापूजन व गोदा आरती करण्यात आली.

हेही वाचा :

The post श्रीरामाच्या जयघोषात गोदावरी उगम ते संगम परिक्रमेस प्रारंभ appeared first on पुढारी.

Exit mobile version