Site icon

सप्त रंगांची उधळण करत वीरांच्या मिरवणुकांसाठी जय्यत तयारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहर-परिसरामध्येधूलिवंदनाला (दि. २५) वीरांचा पाडवा साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. शहराच्या मुख्य परिसरातून मानाच्या दाजीबा वीराची तसेच येसाेजी महाराज मिरवणूक काढण्यात येणार आहे.

नाशिकमध्ये वीरांच्या पाडव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. धूलिवंदनाच्या दिवशी सायंकाळी वेगवेगळ्या देवदेवतांचे सोंग घेऊन हे वीर आपल्या घरातल्या देवतांना स्नान घालण्यासाठी वाजत गाजत गोदातिरी दाखल हाेतात. वीरांच्या या पाडव्यामध्ये दाजीबा वीर व येसोजी महाराज वीराच्या मिरवणुकीला मानाचे स्थान आहे. नवसाला पावणारे वीर अशी श्रद्धा असल्याने भाविक या दोन्ही वीरांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. आपल्या इच्छा व समस्या दाजीबा महाराज व येसोजी महाराजांपर्यंत पोहचवितात. इच्छा पूर्ण झाल्यानंतर भाविकांकडून वीरांना बाशिंग, पाळणा व नारळ अर्पण केले जाते.

दरवर्षीप्रमाणे यंदाही दाजीबा व येसोजी महाराज वीरांच्या मिरवणुकीसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. घनकर लेन येथून येसोजी महाराज वीर यांच्या मिरवणुकीला प्रारंभ होईल. तर दाजीबा वीर मिरवणूक फावडे लेनमधून निघणार आहे. पेठे हायस्कूल, जैन मंदिर परिसर, तेली गल्ली, लोणार गल्ली, रविवार कारंजा, चांदीचा गणपती मंदिर, सराफ बाजार, बालाजी कोठमार्गे रामकुंड येथे मिरवणूक पोहोचेल. तेथील आरतीनंतर दोन्ही दाजीबांची भेट होणार असून फूल बाजार, मेन रोड, सर्फराज लेन येथे सांगता होणार आहे.

पाच पिढ्यांची परंपरा
दाजीबा या वीराचे मूळ स्थान दिंडाेरी तालुक्यातील तळेगाव-अक्राळे फाटा आहे. या वीराच्या मिरवणुकीला साधारणत: पाच ते सहा पिढ्यांची परंपरा आहे. स्व. पुंजाजी भागवत व स्व. दत्तात्रय (आप्पा) गोपाळ भागवत यांनी दाजीबा वीराच्या मिरवणुकीला प्रारंभ केला. यंदा सर्फराज लेन येथील ज्ञानेश्वर कोरडे यांना दाजीबा वीराचा मान देण्यात आला आहे.

हेही वाचा:

The post सप्त रंगांची उधळण करत वीरांच्या मिरवणुकांसाठी जय्यत तयारी appeared first on पुढारी.

Exit mobile version