Site icon

सातव्या दिवशीही तोडगा निघाला नसल्याने सिटीलिंकचा चक्काजामच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पीएफपोटी एक कोटी रुपये जमा केल्यानंतर बुधवारी (दि.२०) थकीत वेतनापोटी ६५ लाख रुपये अदा करूनही सिटीलिंकच्या संपावर सातव्या दिवशीही तोडगा निघू शकला नाही. जोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या वेतन, पीएफ आणि ईएसआयसीच्या ठेकेदाराकडील थकीत रकमेचा एकूण एक रुपया अदा केला जात नाही तोपर्यंत संपावर ठाम राहण्याची भूमिका आंदोलनकर्त्या वाहकांनी घेतल्यामुळे ठेका रद्द करण्याशिवाय सिटीलिंकसमोर आता कुठलाही पर्याय उरलेला नाही.

सिटीलिंकच्या इतिहासातील हा सर्वात मोठा संप ठरला आहे. वाहक पुरवठादार ‘मॅक्स डिटेक्टिव्हज ॲण्ड सिक्युरिटीज’ या कंपनीने दंडाची रक्कम माफ करण्यासाठी वाहकांचे वेतन थकविल्याने वाहकांनी गेल्या दोन वर्षांत नवव्यांदा संप पुकारला आहे. सात दिवसांपासून सुरू असलेल्या या संपामुळे सिटीलिंकची शहर बससेवा पुरती कोलमडून पडली आहे. २५० पैकी तपोवन डेपोतील १५०, तर नाशिकरोड डेपोतील ६० बसेस या संपामुळे बंद असल्यामुळे चाकरमाने, विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत. या संपावर तोडगा काढण्यासाठी सिटीलिंकने सुरुवातीला डिसेंबरच्या वेतनापोटीची आगाऊ रक्कम ठेकेदाराला दिली. त्यानंतर वाहकांचे थकीत असलेले पीएफचे एक कोटी रुपये भरले. बुधवारी थकीत वेतनापोटी आणखी ६५ ला‌ख रुपये भरत संप मिटविण्याचा प्रयत्न केला. यासाठी वाहक पुरवठादार आणि संपकरी वाहकांच्या प्रतिनिधींसमवेत वेळोवेळी बैठका घेतल्या. मात्र, त्यानंतरही तोडगा निघू शकला नाही. गेल्या सात दिवसांत सिटीलिंकच्या तब्बल १५ हजारांहून अधिक बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्या असून, यामुळे सिटीलिंकला तब्बल एक कोटीहून अधिक तोटा सहन करावा लागला आहे.

विद्यार्थ्यांसाठी आपत्कालीन सेवेची भाजपची मागणी
संपकाळातील विद्यार्थ्यांच्या बस पासेसची रक्कम बुडत असल्यामुळे विद्यार्थ्यांना ती परत मिळावी. तसेच ऐन परीक्षा काळात सुरू असलेल्या या संपामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी आपत्कालीन बससेवा सुरू करावी, अशी मागणी भाजपने सिटीलिंकचे व्यवस्थापकीय संचालक तथा महापालिकेचे प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव व युवा मोर्चा अध्यक्ष सागर शेलार यांचा शिष्टमंडळात समावेश होता.

ग्राहक न्यायालयात दावा दाखल करण्याचा इशारा
सिटीलिंकच्या संपामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे महापालिका व सिटीलिंक प्रशासनाने या संपावर तातडीने तोडगा काढावा, अन्यथा ग्राहकांच्या न्याय्यहक्कासाठी ग्राहक न्याय मंचात जाण्याचा इशारा नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीचे उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिला आहे. प्रवासी ग्राहकाला आर्थिक व मानसिक त्रास होत आहे. त्यामुळे ग्राहक सेवेचा अवलंब करून सिटीलिंकने बससेवा त्वरित सुरू करावी. पासधारकांना संपकाळातील दिवसांची मुदतवाढ द्यावी. अन्यथा प्रवासी ग्राहक, मासिक पासधारक व विद्यार्थी ग्राहकांच्या न्याय्यहक्कासाठी ग्राहक न्यायालयात दाद मागितली जाईल, असे पाटील यांनी म्हटले आहे.

हेही वाचा:

The post सातव्या दिवशीही तोडगा निघाला नसल्याने सिटीलिंकचा चक्काजामच appeared first on पुढारी.

Exit mobile version