Site icon

सौरउर्जा : दोन वर्षांत नाशिक महापालिकेची मोठी आर्थिक बचत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक महापालिकेच्या इमारतींवर तीन वर्षांपासून मनपाच्या इमारतींवर रूफ टॉप सोलर सिस्टिम बसविण्यात आलेली आहे. महावितरणच्या दराबरोबर तुलना केल्यास सौरऊर्जा प्रणालीचा फायदा दिसून येत आहे. या सौरयंत्रणेमुळे महापालिकेचा 75 लाखांचा, तर शहरात बसविण्यात आलेल्या एलईडी दिव्यांमुळे सुमारे दोन कोटींचा आर्थिक फायदा महापालिकेचा झाला आहे.

राजीव गांधी भवन, पंचवटी विभागीय कार्यालय, जिजामाता हॉस्पिटल या तीन ठिकाणी सोलर सिस्टिम कार्यान्वित करण्यात आली होती. त्यात भर पडून सिडको विभागीय कार्यालय, नाशिकरोड विभागीय कार्यालय, स्मार्ट सिटी, फाळके स्मारक, महात्मा फुले कला दालन येथील इमारतींवर सौरऊर्जा प्रणाली बसविण्यात आली. त्यातून सप्टेंबर 2019 ते जून 2022 या कालावधीत एकूण 11 लाख 68 हजार 322 युनिट्सची निर्मिती झाली आहे. त्याचा दर 4.59 पैसे इतका आहे. महावितरणचा दर 11 रुपये प्रतियुनिट आहे. म्हणजेच प्रत्येक युनिटमागे 6.41 पैशांची बचत होत आहे. एकूण युनिट्सचा विचार करता मनपाची 74 लाख 88 हजार 944 रुपयांची बचत झाली आहे. मे. वासंग सोलर वन कंपनीने सौरऊर्जा प्रणाली उभारली असून, देखभाल दुरुस्तीही करीत आहे. या कंपनीबरोबर मनपाने पीपीपी तत्त्वावर (सार्वजनिक खासगी भागीदारी) 25 वर्षांचा करार केला आहे. त्यानंतर हा प्रकल्प मनपाकडे हस्तांतरित होईल. भविष्यात मनपाचा विल्होळी आणि सातपूर येथील जलशुद्धीकरण प्रकल्प तसेच मनपाच्या नाशिकरोड येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयातही सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे.

एलईडी पथदीपांमुळे फायदा…
सौरऊर्जा प्रकल्पाबरोबरच एलईडी पथदीपांमधूनही महापालिकेची बचत झाली आहे. टीपी ल्युमिनेअर प्रा. लि. कंपनीने (टाटा) हे दिवे बसविले असून, त्याची देखभाल, दुरुस्ती कंपनीकडून केली जात आहे. मनपाने पीपीपी तत्त्वावर सात वर्षांचा करार कंपनीबरोबर केला आहे. मनपाच्या सहा विभागांत एकूण 99 हजार 785 एलईडी दिवे बसविले आहेत. त्यामध्ये 2,908 हायमास्टच्या दिव्यांचा समावेश आहे. नाशिक स्मार्ट लायटिंग प्रोजेक्टची कमांड कंट्रोलरूम मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन इथे आहे. डिसेंबर 2020 ते ऑक्टोबर 2022 या दोन वर्षांत एकूण चार कोटी 10 लाख 83 हजार 705 युनिट्सचा वापर झाला. यापूर्वी सोडियम दिव्यांमुळे 10 कोटी 84 लाख 70 हजार 247 युनिट्स वापर होत होता. एलईडी दिव्यांमुळे सहा कोटी 73 लाख 86 हजार 497 युनिटची बचत झाली आहे, अशी माहिती अधीक्षक अभियंता धर्माधिकारी यांनी दिली.

विभागनिहाय एलईडी दिव्यांची संख्या अशी…
पंचवटी  – 23,151
पश्चिम  – 8,942
पूर्व – 13,295
नाशिकरोड – 17,994
नवीन नाशिक – 21,382
सातपूर – 15,021

हेही वाचा:

The post सौरउर्जा : दोन वर्षांत नाशिक महापालिकेची मोठी आर्थिक बचत appeared first on पुढारी.

Exit mobile version