Site icon

हमाली- तोलाई मुद्द्यावर बंद : विंचूर उपबाजारात लिलाव सुरळीत

लासलगाव : राकेश बाेरा
लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील विंचूर उपबाजार वगळता, सर्वच बाजार समित्यांमध्ये माथाडी-मापारी कामगारांच्या हमाली, तोलाई, वाराई कपात आणि लेव्ही संदर्भात अद्यापही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे बाजार समित्यांतील शेतीमालाचे लिलाव गेल्या तीन दिवसांपासून पूर्णपणे ठप्प झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील सुमारे ५० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. परंतु, विंचूर उपबाजारात जिल्हा व्यापारी असोसिएशनविरोधात निर्णय घेऊन हमाली कपात केली जात असल्याने तेथे सर्व लिलाव सुरळीत सुरू आहेत.

निफाड न्यायालयामध्ये व्यापारी असोसिएशनतर्फे हमाली-तोलाई कपात करणार नाही असे पत्र शनिवारी (दि. ६) याबाबत न्यायालयाने कामगार आयुक्तालयाला उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. हमाली, तोलाई, वाराई कपात आणि लेव्ही या मुद्द्यावर सर्वमान्य तोडगा निघालेला नसल्यामुळे माथाडी-मापारी कामगारांनी गुरुवार (दि. 4) पासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. यासंदर्भात त्यांनी बाजार समित्यांना पत्रदेखील दिलेले आहे. याच कारणामुळे बाजार समित्यांमध्ये लिलाव ठप्प झाले आहेत. आशिया खंडातील कांद्याची मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीत दररोज कांदा तसेच धान्याची मोठी आवक होते. हमाली, तोलाई व वाराई कपातीसह लेव्हीच्या प्रश्नावरून बाजार समिती बंद असल्याने करोडो रुपयांची उलाढाल मंदावली आहे. सध्या लग्नसराई असल्याने अनेक शेतकऱ्यांना कांदा विक्री करण्याची गरज आहे. परंतु, लिलाव बंद केल्याने ऐनवेळी उत्पन्न मिळवण्याचा मार्ग बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

व्यापारी आपल्या भूमिकेवर ठाम
माथाडी मापारी कामगारांची हमाली, तोलाई, वाराई कपात आणि लेव्हीसंदर्भात या मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी (दि. ५) देवळा येथे कांदा व्यापाऱ्यांची बैठक झाली असून, बैठकीत बाजार समिती सुरू करण्यास विरोध नसल्याचे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले. मात्र, शेतकऱ्यांच्या हिशेबपट्टीतून हमाली, तोलाई, वाराई कपात करणार नसल्याच्या भूमिकेवर व्यापारीवर्ग ठाम असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.

हेही वाचा:

The post हमाली- तोलाई मुद्द्यावर बंद : विंचूर उपबाजारात लिलाव सुरळीत appeared first on पुढारी.

Exit mobile version