Site icon

हेमंत गोडसे छोटा मच्छर : संजय राऊतांनी हिनवलं

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मागील महिन्यात नाशिकमध्ये शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना गोडसे यांनी राऊतांनी माझ्यासमोर नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान दिले होते. या आव्हानाला बुधवारी (दि.१४) उत्तर देताना संजय राऊत यांनी गोडसेंवर टीका करताना गोडसे छोटा मच्छर आहे. तो गटारात वाहून जाईल, अशा शब्दांत गोडसेंची हीनवणी केली.

नाशिक येथे खासगी दौऱ्यावर आलेल्या राऊतांनी नाशिकमधील कोणताही शिवसैनिक हा गोडसेंचा पराभव करून त्याचे डिपॉझिट जप्त करू शकतो, असा दावा केला. नाशिक शहरात ठाकरे गटात कोणतीही गटबाजी नसल्याचे सांगत गट येतात आणि वाहूनही जातात, अशा शब्दांत पक्षात सुरू असलेल्या वादविवादावर टिप्पणी केली. लोकसभेची उमेदवारी करंजकर यांना देणार का या प्रश्नावर बोलताना राऊत म्हणाले, जिल्हाप्रमुख हा सेनापती असतो. त्याला कुणाशी कसे लढायचे याची माहिती असते. नाशिक लोकसभेतून करंजकरच काय सुनील बागूल, भाऊसाहेब चौधरी, दत्ता गायकवाड, मुशीर सय्यद आणि साधा शिवसैनिकही गोडसेंचा पराभव करू शकतो, असा विश्वास व्यक्त केला. गेल्या लोकसभा निवडणुकीत गोडसेंना मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यांसह शिवसेनेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांचाही विरोध होता. असे असताना केवळ विद्यमान खासदार म्हणून त्यांना उमेदवारी देण्यात आली. गोडसे मातोश्रीवर आले आणि चुका दुरुस्त करू, असे आश्वासन दिल्याने त्यांना उमेदवारी देण्यात आल्याचा खुलासा राऊत यांनी केला.

गटबाजीचे श्राध्द घालू

स्व. बाळासाहेब ठाकरे संग्रहालय व स्मारकातील कामावरून ठाकरे गटात वाद निर्माण झाला आहे. त्याविषयी राऊत यांना विचारले असता तो स्थानिक विषय आहे. संबंधितांशी बोलून त्यावर मार्ग काढला जाईल. त्यावर स्थानिक नेते तोडगा काढतील, असे सांगत गट-तट आणि गटबाजी असेल तर गोदावरीच्या तीरावरच त्याचे श्राध्द घालू, अशा शब्दांत त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवसेना पक्ष मजबूत असून, पक्षातून कोणीही नाराज नाही आणि इतर कुठेही जाणार नसल्याचे सांगितले.

हेही वाचा :

The post हेमंत गोडसे छोटा मच्छर : संजय राऊतांनी हिनवलं appeared first on पुढारी.

Exit mobile version