Site icon

Dhule ZP : अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी भाजपकडून ‘या’ नावांवर शिक्कामोर्तब

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भारतीय जनता पार्टीने अश्विनी पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असून उपाध्यक्षपदासाठी शिरपूरचे देवेंद्र पाटील यांना पसंती दिली आहे. या जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचे निर्विवाद बहुमत असल्यामुळे या दोघांची निवड निश्चित मानली जाते आहे. मात्र महाविकास आघाडीने देखील अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी उमेदवार दिला असून ऐनवेळी करिष्मा होईल अशी अपेक्षा करून गुप्त पद्धतीने मतदानाची मागणी केली आहे.

धुळे जिल्हा परिषदेमधील भारतीय जनता पार्टीने निर्विवाद बहुमत मिळवले आहे. या जिल्हा परिषदेत एकूण 56 गट असून त्यातील 36 जागा भारतीय जनता पार्टीने जिंकल्या आहेत. शिवसेनेकडे चार, राष्ट्रवादीकडे सहा ,काँग्रेसकडे सात तर तीन जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. गेल्यावेळी अध्यक्षपदासाठी भारतीय जनता पार्टीचे बोराडी गटाचे भाजपाचे उमेदवार तुषार रंधे यांना संधी मिळाली होती. त्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण महिला असे आरक्षण निघाल्यामुळे या जागेवर माजी उपाध्यक्ष सुभाष देवरे यांच्या स्नुषा धरती देवरे यांना संधी मिळेल ,अशी साऱ्यांचीच अटकळ होती. मात्र आज ऐनवेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती अरविंद जाधव यांच्या स्नुषा अश्विनी पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला .तर उपाध्यक्ष पदासाठी देवेंद्र पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भारतीय जनता पार्टीचे एकूण संख्या बळ पाहता या दोघांची निवड निश्चित मानली जात आहे.

दरम्यान महाविकास आघाडी कडून शिवसेनेच्या वतीने धमाने गटाच्या सदस्य सूनिता शानाभाऊ सोनवणे यांनी तर उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या मोतनबाई पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी गुप्त पद्धतीने मतदान घेतल्यास त्याचा फटका भाजपला बसू शकतो, अशी शक्यता शिवसेनेचे शानाभाऊ सोनवणे यांनी व्यक्त केली आहे. गेल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेची सत्ता भाजपाकडे असताना देखील याच पक्षाच्या सदस्यांनी उघडपणे सभागृहात आंदोलने केली आहे. त्यामुळे अनेक सदस्यांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याने गुप्त पद्धतीने मतदान झाल्यास वेगळे चित्र दिसू शकते, असा दावा देखील त्यांनी केला आहे.

हेही वाचा :

The post Dhule ZP : अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी भाजपकडून 'या' नावांवर शिक्कामोर्तब appeared first on पुढारी.

Exit mobile version