Site icon

Nashik:..’एक रस्ता मला चांगला दाखवा’; नाशिकमध्ये रंगले स्मार्ट खड्डे कविसंमेलन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कवी नितीन गाढवे यांची, ‘गाव-शहरातला आपला दाखवा, एक रस्ता मला चांगला दाखवा’ ही कविता, ‘रस्त्यावर खड्डे झाले जागोजागी, कंबर अभागी मोडलेगा’ असा कवी प्रशांत केंदळेंचा अभंग असो की, रविकांत शार्दुल यांची ‘खड्डे झाले स्मार्ट गड्यांनो, सेल्फी काढू’ अशा खड्डयांवर आधारित कवितांनी साहित्यिकांनी भूमिका घेत मनपा प्रशासनाच्या कारभारावर आसूड ओढत वाहनधारकांच्या कसरतीकडे सर्वांचे लक्ष वेधले.

निमित्त होते भाकपच्या वतीने आयटक कार्यालयात पार पडलेल्या स्मार्ट खड्डे कविसंमेलनाचे. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. शंकर बोर्‍हाडे होते. यावेळी खड्ड्यांवर कवींनी भूमिका घेत, प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. कधी यातून रोष उमटला, तर कधी उपहास, कधी विनोद, तर कधी टीकाटिपणी, रवींद्र मालुंजकर यांनी, ‘खड्डे झाले आहेत कवितेचा विषय, खड्ड्यात जातो की काय, कवितेचा आशय’, जयश्री वाघ यांनी, ‘या वाटेवर, या वळणावर, सरळ चालेल किती तरी, काय करू जर पाय घसरला अन् पाय मुरगळला, तर’, प्रशांत कापसे यांनी, ‘आयुष्यभर खातच आलो खस्ता, 50 वर्षे झाली, तरी तसाच आमचा रस्ता’, सुरेश भडके यांनी, ‘अहो खड्ड्यांचे काय घेऊन बसला, एकेक खड्डा 45 हजार खाऊन बसला’ आणि संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. बोर्‍हाडे यांनी, ‘सर आली धावून रस्ता गेला वाहून, डांबर झाले गोळा खड्डे पडले सोळा’ कविता सादर करून खड्डे अधोरेखित केले. दिलीप पवार, पुष्पलता गांगुर्डे, राज शेळके, कविता बिरारी, देवांग जानी, सचिन आहिरे, दिगंबर काकड, विलास पंचभाई आदींनीही सहभाग घेतला. भाकप सचिव महादेव खुडे यांनी सूत्रसंचालन केले. दत्तू तुपे यांनी आभार मानले.

खड्ड्यांसंदर्भात निवेदने देऊन थकल्याने आता साहित्यिकांनी भूमिका घ्यावी, या उद्देशाने हे कविसंमेलन आयोजित केले होते. मनपा, महाराष्ट्र शासन, केंद्र सरकारने जागे व्हावे, जनतेचे प्राण वाचावे हीच अपेक्षा.
– राजू देसले, आयोजक, कविसंमेलन

हेही वाचा :

The post Nashik:..'एक रस्ता मला चांगला दाखवा'; नाशिकमध्ये रंगले स्मार्ट खड्डे कविसंमेलन appeared first on पुढारी.

Exit mobile version