Site icon

Nashik News : ऐतिहासिक महाबोधिवृक्षाच्या फांदीचे रोपण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; श्रीलंकेतील अनुराधापुरा येथील तब्बल २२५५ वर्षांची परंपरा लाभलेल्या एेतिहासिक महाबोधिवृक्षाच्या फांदीचे पाथर्डी शिवारातील त्रिरश्मी लेणीच्या पायथ्याशी असलेल्या बुद्ध स्मारकात रोपण करण्यात आले. श्रीलंका, कंबोडिया, मलेशिया, थायलंड, नेपाळ येथील भन्ते, भिक्खूंच्या खास उपस्थितीत हा सोहळा पार पडला. बुद्धवंदनेच्या स्वरात या फांदीचे रोपण करण्यात आले.

महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्ट, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सम्राट अशोक विजयादशमीनिमित्त हा सोहळा आयोजित केला होता. श्रीलंका, मलेशिया, थायलंड येथील भिक्खू नारायणपणावे, भिक्खू डॉ. पोंचाय पलावाधम्मो, भदंत खेमधम्मो महस्थवीर, हेमरथाना नायक थेरो, सरणंकरा महाथेरो यांच्यासह मुख्य संयोजक भन्ते सुगत थेरो, मुख्य निमंत्रक भिक्खू संघरत्न थेरो, भदंत आर्यनाग, भदंत यु नागधम्मो महाथेरो, के. आर. लामा, भदंत आर. आनंद, भदंत सुमनसिरी, भदंत काश्यप, भदंत धम्मरक्षित उपस्थित होते. याशिवाय श्रीलंकेचे धार्मिक आणि सांस्कृतिक मंत्री विदू विक्रम नायका, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री दादा भुसे उपस्थित होते. सोहळ्याच्या प्रारंभी महाबोधिवृक्षाच्या फांदीची स्मारकाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भिक्खूंच्या उपस्थितीत पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर धम्म स्तुपातील भगवान गौतम बुद्ध यांच्या पंचधातूच्या मूर्तीसमोर महाबोधिवृक्ष ठेवून समस्त भिक्खूंच्या उपस्थितीत बुद्धवंदना घेण्यात आली. पुढे भन्ते सुगत थेरो यांनी स्तूप ते रोपण स्थळापर्यंत फांदी डोक्यावर आणली. याठिकाणी बुद्ध उपासना घेऊन फांदीचे रोपण करण्यात आली. हा संपूर्ण सोहळा भन्ते, भिक्खूंच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी नाशिक जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतील बौद्ध उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पौर्णिमेला महाबोधिवृक्षाचे दर्शन

महाबोधिवृक्षाच्या रोपाचे दर्शन घेता यावे याकरिता दर पौर्णिमेला ते उपासकांसाठी खुले केले जाणार आहे. म्हणजेच महिन्यातून एकदाच वृक्षाचे दर्शन घेता येईल. इतर दिवशी सुरक्षेच्या कारणास्तव ते बंदिस्तपणे ठेवले जाणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

देशात दुसरा महाबोधिवृक्ष

उत्तर प्रदेशातील बोधगयानंतर नाशिक येथे महाबोधिवृक्षाचे उपासकांना दर्शन घेता येणार आहे. सम्राट अशोक यांची मुलगी संघमित्रा यांनी बोधगया येथून महाबोधिवृक्षाच्या फांदीचे श्रीलंकेतील अनुराधापुरा येथे रोपण केले होते. आता त्याच एेतिहासिक महाबोधिवृक्षाच्या फांदीचे नाशिकमध्ये रोपण करण्यात आले आहे. त्यामुळे महाबोधिवृक्ष असलेले नाशिक बोधगयानंतर दुसरे शहर बनले आहे.

१८ कोटींचा निधी

महाबोधिवृक्षाच्या फांदी रोपण सोहळ्यासाठी राज्य शासनाने १८ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून त्रिरश्मी लेणी येथे भिक्खू संघ निर्माण केला जाणार आहे. तसेच वृक्षाच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही आणि पोलिस चौकीही उपलब्ध करून दिली जाणार आहे.

पर्यटनवाढीला मिळेल चालना

धार्मिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये महाबोधिवृक्षाचे रोपण केले गेल्याने पर्यटनवाढीला चालना मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हा वृक्षामुळे नाशिकचे नाव देशात-विदेशात पोहोचेल. वृक्षाच्या दर्शनासाठी जगभरातील उपासक याठिकाणी येण्याची शक्यता आहे.

The post Nashik News : ऐतिहासिक महाबोधिवृक्षाच्या फांदीचे रोपण appeared first on पुढारी.

Exit mobile version