ओझर : मंदिर घेण्यासाठी आलेल्या चोरट्याचा दुकानदाराला गंडा; साडेसहा तोळे दागिन्यांवर डल्ला

नाशिक

ओझर; पुढारी वृत्तसेवा : नगरपरिषदनजीकच्या जाजू गल्लीतील एका फर्निचर दुकानात एक व्यक्ती देवघर घेण्याच्या बहाण्याने आला आणि भुरळ घालून अंगावरील सोने लुटून पसार झाल्याची घटना समोर आली आहे.

याबाबत सविस्तर घटना अशी की, रामेश्वर रामदयाल बांगड यांचे फर्निचरचे मॉल आहे. याठिकाणी मंगळवारी (दि. १९) दुपारी तीन वाजताच्या सुमारास तोंडाला मास्क लावत एक व्यक्ती आली. या व्यक्तीने मंदिर खरेदी करण्यासाठी आला असल्याचे सांगत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यावेळी अंगठ्या व गळ्यातील चैन काढून या पैशात द्या तुमचा व्यवसाय भरभराटीस येईल असे सांगून भुरळ घातली. त्याच्या जाळ्यात अडकलेले मालक रामेश्वर बांगड यांनी चेन अंगठी काढून त्याच्या हातात दिली. संशयित आरोपीने हातचलाकी करुन सर्व दागिने पिशवीत ठेवल्याचे नाटक केले. आणि दुकान मालकाला भुलवून दागिने नसलेली पिशवी मालकाच्या समोर ठेवून तोंड बांधून काऊंटरवर ठेवली. त्यानंतर ही पिशवी पाच मिनिटानंतर उघडून पहा असे सांगून चोरटा निघून गेला. थोड्या वेळाने बांगड यांनी पिशवी उघडून पाहिली असता त्यामध्ये पाहिले तर नगलीचे पान, बिस्कीट व फुलवाती होत्या. हे पाहून दुकान मालाकाला संशयित व्यक्तीने फसवल्याची खात्री झाली. याबाबत ओझर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्यासह बापू अहिरे करत आहे.

The post ओझर : मंदिर घेण्यासाठी आलेल्या चोरट्याचा दुकानदाराला गंडा; साडेसहा तोळे दागिन्यांवर डल्ला appeared first on पुढारी.