नंदुरबार : नर्मदेच्या दरीत अडकलेल्या युवकाची पंधरा तासांनी सुटका

नंदुरबार: पुढारी वृत्तसेवा

तब्बल 80 फूट खोल दरीत अडकलेल्या युवकास पोलिसांनी तब्बल १५ तासांच्या मोहिमेनंतर सुखरूप बाहेर काढत प्राण वाचविले. धडगावचे पोलिस आणि स्थानिक ग्रामस्थांनी पहाटेपर्यंत सुरू असलेली बचाव मोहीम यशस्वी केली.

धडगाव पोलिस ठाणे हद्दीतील भूषा (खर्डी) येथे एका दरीच्या कपारीत युवक अडकून पडल्याची माहिती नंदुरबार जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांना मिळताच त्यांनी धडगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकाऱ्यांना तत्काळ घटनास्थळी धाडले. धडगावचे पोलिस निरीक्षक इशामोद्दीन पठाण, पोलिस उपनिरीक्षक राहुल पाटील, पोलिस नाईक कालूसिंग पाडवी, पोलिस अंमलदार जानसिंग वळवी यांनी बचाव मोहिमेत भाग घेतला. परंतु खोल दरीमुळे त्या ठिकाणी जाणे शक्य नव्हते. पोलिसांनी तत्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना मदतीसाठी बोलावून घेतले.

परंतु अंधारामुळे अडथळे येते होते. पहाटे राहुल पाटील व गावकरी दरीत उतरले. शोध घेतला असता हा युवक नर्मदा नदीकिनारी दरीत अवघड जागेवर अडकून पडल्याचे दिसून आला. त्यानंतर धडगाव पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने अथक प्रयत्न करून दोरीच्या सहाय्याने दरीत अडकलेल्या युवकास सुखरूप बाहेर काढले. त्याचे नाव संजय मुजालदे असे असून, तो मध्य प्रदेशच्या बडवाणी जिल्ह्यातील मुतरकुन्ड येथील आहे. पोलिसपाटीलांनी या युवकाचे काका संजय मुजालदे यांच्याशी संपर्क साधत त्यांना बोलावून घेत ताब्यात दिले.

हेही वाचा :

The post नंदुरबार : नर्मदेच्या दरीत अडकलेल्या युवकाची पंधरा तासांनी सुटका appeared first on पुढारी.