राज्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यात बेंचमार्क सर्वेक्षण : विजयकुमार गावित यांची माहिती

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : आदिवासी बांधवांसाठी विकासाच्या कार्ययोजना आखण्यासाठी वस्तुनिष्ठ आणि अद्ययावत सांख्यिकी माहीती उपलब्ध होण्यासाठी राज्यातील 17 आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये आगामी मार्च २०२४ पासून बेंचमार्क सर्वेक्षण करणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी दिली.

सध्या प्रायोगीक तत्वावर नंदुरबार जिल्ह्यात अशा पद्धतीने बेंचमार्क सर्वेक्षण सुरु करण्यात आले असून आठ महिन्यात हे सर्वेक्षण पुर्ण केले जाणार आहे, असेही मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित म्हणाले. राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी आज नंदुरबार येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्या प्रसंगी त्यांनी ही माहिती दिली. त्यांच्या समवेत खासदार डॉ हिना गावित, जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया गावित या देखील पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित होत्या.

माहिती देताना त्यांनी सांगितले की, आदिवासी बांधवांच्या सर्वांगीन विकासासाठी राज्य शासन विविध योजना तयार करत आहे. यासाठी आदिवासी संशोधन व प्रशिश्रण संस्था पुणे यांनी सर्व प्रथम 1978 – 80 दरम्यान राज्यतला पहिला बेचमार्क सर्वेक्षण पुर्ण केले. यानंतर 1996-97 साली दुसरे बेचमार्क सर्वेक्षण करण्यात आले. आता दुसऱ्या सर्वेक्षणाला देखील 26 वर्षांचा कालावधी पुर्ण झाला आहे.

या 26 वर्षात आदिवासींसाठी विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. त्याची फलश्रुती झाली आहे. सध्या राज्यातील आदिवासी बांधवाच्या रोजगार, शिक्षण, आर्थिक , सामाजीक स्थिती नेमकी काय आहे. त्यात काय सुधारणा करण्याची गरज आहे. याच अनुशंगाने आता बेंचमार्क सर्वेक्षण करण आवश्यक होते. यासाठी केंद्राने आदिवासी विभागाला 2.5 कोटींचा निधी देखील दिला होता. यानुसार प्रायोगीक तत्वावर नंदुरबार जिल्ह्याची निवड करुन या सर्वेक्षणाला सुरवात करण्यात आली आहे.

जिल्ह्यातल्या 952 गावांची त्यातील वाड्या पाड्यात राहमआऱया आदिवासी कुटुंबाची माहीती संकलीत केली जाणार आहे. येत्या आठ महिन्यात हे सर्वेक्षण पुर्ण केले जाईल. या सर्वेक्षणातून स्थलांतराची स्थिती त्याची कारणमिमांसा, शिक्षण गळती प्रमाण, त्यात सुधार पद्धतीची आवश्यकता,या सर्व बाबी अंतर्भूत केल्या जाणार आहेत. या बेंचमार्क सर्वेक्षणांवरुन आगामी काळात आदिवासी बांधवांच्या विकासासाठी योजनांची अंमलबजावणी आखणी आणि त्याचे नियोजन सुकर होईल असा आशावाद देखील यावेळी मंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी व्यक्त केला.

The post राज्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यात बेंचमार्क सर्वेक्षण : विजयकुमार गावित यांची माहिती appeared first on पुढारी.