नाशिक : दंड भरा अन् बिनधास्त प्लास्टिकचा वापर करा

नागपूर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
एखाद्या चुकीबद्दल हजारो रुपयांचा दंड भरल्यानंतर सहसा कोणी त्याच चुकीची पुनरावृत्ती करण्यास धजावणार नाहीत. मात्र, प्लास्टिक वापराबद्दल दंड झाल्यानंतरही काही व्यावसायिक निर्धास्तपणे खुलेआम प्लास्टिक वापरत असल्याचे आढळून येत आहे.

गंगापूर रोडवर मागील दोन ते तीन दिवसांत मनपाच्या पथकाने दूध व्यावसायिकांना प्लास्टिक पिशव्या वापरल्याबद्दल दंड केला. मात्र, त्यानंतरही व्यावसायिकांनी पिशव्यांचा वापर निर्धास्तणे खुलेआम केला. त्यामुळे दंडाचा हेतू प्लास्टिक वापराला विरोध करण्यासाठी होता की, प्लास्टिक पिशव्यांच्या वापरासाठी सहा महिने सूट देण्यासाठी होता, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पर्यावरण संरक्षणासाठी प्लास्टिकचा वापर कमी करण्यावर प्रशासनाचा भर आहे. त्यासाठी दैनंदिन वापरात प्लास्टिकचा वापर कमीत कमी व्हावा यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. पर्यावरणाला घातक असणार्‍या प्लास्टिक, थर्माकोल व प्लास्टिकपासून तयार केलेल्या वस्तू आणि एकदाच वापरल्या जाणार्‍या डिस्पोजेबल वस्तूंच्या उत्पादनासह वापरावर बंदी घातली आहे. या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांना 5 ते 25 हजार रुपयांपर्यंतचा दंड तसेच कारावासाचीही तरतूद आहे. त्यानुसार मनपा प्रशासनातर्फे शहरात अनेक ठिकाणी कारवाई केली जाते. त्यात व्यावसायिकांवर विशेष लक्ष केंद्रित केले असून, प्रतिबंधित असलेले प्लास्टिक वापरणार्‍या व विक्री करणार्‍यांवर मनपाच्या वतीने दंडात्मक कारवाई केली जाते. त्यानुसार गंगापूर रोडवरील काही दूध व्यावसायिकांवर मनपाच्या पथकाने तीन दिवसांपूर्वी दंडात्मक कारवाई केली. मात्र, कारवाई करूनही या व्यावसायिकांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर न टाळता पुन्हा पिशव्यांमध्ये दूध वितरण करत असल्याचे आढळून येत आहे. कारवाई करताना दोन ते तीन व्यावसायिकांना मिळून पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. त्या मोबदल्यात सहा महिने पुन्हा कारवाई करणार नाही, अशी हमी व्यावसायिकांनी मनपाच्या पथकातील अधिकारी – कर्मचार्‍यांकडून घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी खुलेआम पुन्हा पिशव्यांमधूनच दूधवाटप केल्याचे चित्र दिसत आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : दंड भरा अन् बिनधास्त प्लास्टिकचा वापर करा appeared first on पुढारी.