Site icon

आगीच्या विचित्र घटनांमुळे नाशिकच्या लहवित गावात भीतीचे सावट

देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा- नाशिक तालुक्यातील लहवित गावच्या अंबड गावठाण येथे गेल्या तीन-चार दिवसांपासून काही रहिवाशांच्या घरांमध्ये भरदिवसा जाळपोळीचे प्रकार होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हे प्रकार अंधश्रद्धेतून की, मनोविकृताकडून होत आहेत याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. याबाबत पोलिसपाटील यांनी देवळाली कॅम्प पोलिसांना माहिती दिली आहे.

काही वर्षांपूर्वी लहवित गावातील घरांवर रात्रीच्यावेळी दगडफेकीचे प्रकार घडायचे. त्यावेळी जिल्हाधिकारी ते पोलिस आयुक्त यांनी दखल घेत सदर प्रकरणाची चौकशी केली होती. त्यानंतर बंद झालेले प्रकार पुन्हा पाच वर्षांनंतर सुरू झाले. येथील चार-पाच घरांच्या बाहेर वाळत असलेले कपडे व गृहोपयोगी साहित्य जाळण्याच्या घटना घडत आहेत. नेमकी घरामध्ये आग कोण व कधी लावते, याबाबत गूढ निर्माण झालेले आहे. याबाबत पोलिसपाटील संजय गायकवाड यांनी देवळाली कॅम्प पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे यांनी घटनास्थळी जात पाहणी केली. यावेळी त्यांनी एखाद्या मनोविकृताचे हे कृत्य असावे, असा अंदाज वर्तवला. ग्रामस्थांना व पंचायतीला ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. लवकरच या प्रकारचा उलगडा केला जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त करत ग्रामस्थांना धीर दिला आहे.

हेही वाचा –

Exit mobile version