Site icon

किडनीदान करत प्राध्यापक पत्नीने दिले पतीला जीवदान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; विवाह म्हणजे सात जन्मांची लग्नगाठ अशी भावना आजही भारतीय समाजात रूढ आहे. जन्मोजन्मी तोच पती मिळावा म्हणून आजच्या आधुनिक युगातही वटवृक्षाला फेरे मारणाऱ्या महिला आपण पाहताे. मात्र, खरोखरीच पतीवर आलेल्या संकटाला परतवून लावण्यासाठी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता समोरे जाणाऱ्या सावित्री आपल्याला अपवादानेच दिसतात. अशाच एका सावित्रीने आपल्या पतीला किडनीदान करत जीवनदान दिल्याने खऱ्या अर्थाने तिने आर्धांगिनीचे कर्तव्य पार पाडल्याची भावना व्यक्त होत आहे.

मूळच्या माडसांगवी (ता. नाशिक) येथील असलेल्या प्रा. शालिनी पेखळे-घुमरे यांनी ऐन नवरात्रोत्सवात पतीला किडनी दान केल्याने जीवनदान मिळाले आहे. प्रा. पेखळे-घुमरे या नवजीवन विधी महाविद्यालयात प्राध्यापक असून, त्यांचे पती मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नाशिक येथील विधी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. दोघेही मानधन तत्त्वावर असल्याचे त्यांची कौटुंबिक परिस्थिती साधारण आहे. त्यांच्या विवाहाला 15 वर्षे झाली असून एक मुलगा आहे. सगळे सुरळीत सुरू असताना दीड वर्षापूर्वी प्रा. डॉ. मनोज पेखळे यांना किडनीचा त्रास असल्याचे निदान झाले. त्यातच मागील आठ महिन्यांपासून डायलेसिस सुरू असूनही दोन्ही किडन्या निकामी झाल्याने किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. अशा परिस्थितीत खचलेल्या पतीला आणि कुटुंबाला सावरण्यासाठी प्रा. शालिनी यांनी पुढे येत किडनी देण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे त्यांची किडनी प्रा. डॉ. पेखळे यांना जुळल्याने त्यांना मोठे हायसे वाटले. त्यांची किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया नाइन पल्स हॉस्पिटल येथे डॉ. नागेश अघोर यांनी केली. यामुळे ऐन नवरात्रोत्सवात आर्धांगिनीच्या रूपाने दुर्गा धावून आल्याची भावना पेखळे कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

एक स्त्री काय करू शकते, याची जाणीव यानिमित्ताने झाली. पतीला जीवनदान देण्याची शक्ती आणि संधी मला मिळाली. अवयवदानासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज आहे. त्यामुळे हताश झालेल्यांच्या जीवनात आशेचे किरण निर्माण होऊ शकतात. त्यात आपला सहभाग आपण देऊ शकतो.

प्रा. शालिनी पेखळे

 

हेही वाचा :

The post किडनीदान करत प्राध्यापक पत्नीने दिले पतीला जीवदान appeared first on पुढारी.

Exit mobile version