Site icon

खोके ऐकून आता सगळ्यांचे डोके फिरायला लागले; गुलाबराव पाटील यांची संजय राऊतांवर टीका

जळगाव, पुढारी वृत्‍तसेवा : संजय राऊत यांनी खोक्यांवरही एसआयटी लावायला हवी, अशी टीका केली आहे. यावरून पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पलटवार केला. खोके ऐकून आता सगळ्यांचे डोके फिरायला लागले, असे गुलाबराव पाटील म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करणे चुकीचे आहे, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.

नागपूर एनआयटी भूखंड घोटाळ्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एनआयटी भूखंड घोटाळा उघडकीस आला म्हणून देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाऊन सारवासारव करत आहेत, असा आरोप राऊतांनी केला.

राऊतांच्या या आरोपाला शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “जे काही आहे ते तुमच्यासमोर आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊन अवघे तीन ते चार महिने झाले आहेत. असं असताना मुख्यमंत्र्यांवर असे आरोप करणे, हे चुकीचे आहे. दिल्लीला जाणं हे मुख्यमंत्र्यांचं कामच असतं. केंद्रातून काही योजना किंवा पैसे आणायचे असतील, तर ते दिल्लीला जातात. योगायोगाने हे प्रकरणही एकाचवेळी आलं तर ते सारवासारव करायला गेले, असा आरोप करणे उचित नाही,” अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटलांनी दिली.

गिरीश महाजन यांची राऊतांवर टीका

भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनीही संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. सकाळपासून तोंड मोकळं सोडायचं व जिभेला हाड नाही म्हणून काहीही बोलायचं, हा संजय राऊत यांचा धंदा झाल्याची टीका मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. तसेच रोज सकाळी बातमी पाहिजे म्हणून ते काहीही बोलतात, त्यामुळे संजय राऊत हा गांभीर्याने घेण्यासारखा विषय नाही, असा टोलादेखील मंत्री गिरीश महाजन यांनी लगावला आहे.

दिशा सालियान प्रकरणाची एसआयटी चौकशी 

यादरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी दिशा सालियान प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. दिशा सालियन हा विषय वेगळा आहे, त्यावर आतापर्यंत चौकशी झाली नव्हती. मात्र आता चौकशीची मागणी करण्यात आल्याने या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्यात येणार असल्याचे महाजनांनी सांगितले आहे.

.हेही वाचा  

पुणे: गावठाणापासून 200 मीटर आतील जमीन अकृषिक करून घ्या, अधिकार्‍यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

चंद्रपूर : महिलांच्या प्रसंगावधानामुळे वाघाच्या हल्ल्यातून बचावली महिला

देशातील मूळ प्रश्‍नांना बगल देण्‍यासाठीच हिंदू-मुस्‍लिमांमध्‍ये दुही पसरविण्‍याचे काम : राहुल गांधींचा आरोप

The post खोके ऐकून आता सगळ्यांचे डोके फिरायला लागले; गुलाबराव पाटील यांची संजय राऊतांवर टीका appeared first on पुढारी.

Exit mobile version