जळगाव जिल्ह्याला तिसरे मंत्रीपद; अमळनेरात अनिल पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे ४० आमदार फोडून सरकारमध्ये सहभागी झाले. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून त्यांच्यासोबत जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील आमदार अनिल भाईदास पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आमदार अनिल पाटील यांच्या रुपात जळगाव जिल्ह्याला तिसरे मंत्रीपद मिळाले आहे. गिरीष महाजन व गुलाबराव पाटील यांच्यानंतर आता तिसरे अनिल पाटील यांना मंत्रीपद मिळाले आहे.

अनिल भाईदास पाटील हे २०१९च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आले होते. अनिल पाटील यांनी जिल्हा परिषद, बाजार समिती, जिल्हा बँक, नगरपरिषद अशा एकूण १६ निवडणुका लढवल्या असून दोनदा भाजपकडून विधानसभेतील पराभव वगळता त्यांनी नेहमी विजय मिळवला आहे. २०१७ त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. अनिल पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद देखील आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. यावेळी पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी त्यांच्या समर्थकांनी राजीनामाअस्त्र उपसले होते. यात अनिल पाटील यांचाही समावेश होता. त्यांनी आमदारकीचा राजीनामा शरद पवारांकडे पाठविला होता. त्यानंतर त्यांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांचे नेतृत्व स्विकारले आहे. अनिल पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच अमळनेर शहरात कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. तर काही कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत.

The post जळगाव जिल्ह्याला तिसरे मंत्रीपद; अमळनेरात अनिल पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष appeared first on पुढारी.