Site icon

दिवाळीच्या तोंडावर लाखोंचे भेसळयुक्त खाद्यतेल, श्रीखंड जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त खाद्यपदार्थ विक्रीस आणण्यात आले असून, अन्न, औषध प्रशासनाकडून सातत्याने विक्रेत्यांवर कारवाई करून लाखोंचा भेसळयुक्त साठा जप्त केला जात आहे. शहरातील मधुर फूड प्लाझा येथे श्रीखंड तर सिन्नर, माळेगाव एमआयडीसीमधील इगल काॅर्पोरेशन, अे १३ मध्ये लाखो रुपयांचा खाद्यतेलाचा साठा जप्त केला आहे.

प्रशासनाने सोमवारी (दि. ६) गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. मधुर फूड प्लाझा येथे प्लास्टिक डब्यांमध्ये श्रीखंडाचा साठा केला होता. श्रीखंडाच्या पॅकिंगची तपासणी केली असता, त्याच्या लेबलवर बॅच क्रमांक, उत्पादनाची तारीख तसेच एक्स्पायरी तारीख, कुठे व कुणी उत्पादन केले याबाबतचा पत्ता नमूद नसल्याचे आढळून आले. या साठ्यातून नमुना घेऊन उर्वरित ६१.५ किलो साठा लेबल दोषयुक्त व अप्रमाणित असल्याच्या संशयावरून जप्त करण्यात आला. या साठ्याची किंमत १८ हजार ४५० इतकी आहे. अन्नसुरक्षा अधिकारी प्रमोद पाटील यांनी साठा जप्त केला.

दुसऱ्या कारवाईत माळेगाव एमआयडीसीतील इगल काॅर्पोरेशन येथे खुल्या खाद्यतेलाचा साठा आढळला. पुनर्वापर केलेल्या डब्यांमध्ये हे तेल होते. भेसळीच्या संशयावरून तेलाचा हा साठा अन्नसुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन यांनी जप्त केला. तेलाच्या साठ्यात रिफाइण्ड सोयाबीन तेलाचे (खुले) ५३ प्लास्टिक कॅन जप्त केले असून, त्याची किंमत ९३ हजार ३३५ आहे. तसेच पुनर्वापर केलेल्या ४१ डब्यांत ६१३.४ किलो रिफाइंड सोयाबीन तेल (किंमत ६२ हजार ५६६ रुपये), पुनर्वापर केलेल्या २८ डब्यांत ४१८.४ किलो रिफाइंड पामेलिन तेल (किंमत ३७ हजार ५५६) असा एकूण १ लाख ९३ हजार ५५८ किमतीचा खाद्यतेल साठा जप्त करण्यात आला. ही कारवाई सहायक आयुक्त (अन्न) विनोद धवड, उदयदत्त लोहकरे यांच्या नेतृत्वाखाली अन्नसुरक्षा अधिकारी पी. एस. पाटील, सुवर्णा महाजन, अविनाश दाभाडे यांच्या पथकाने केली.

हेही वाचा :

The post दिवाळीच्या तोंडावर लाखोंचे भेसळयुक्त खाद्यतेल, श्रीखंड जप्त appeared first on पुढारी.

Exit mobile version