Site icon

दिवाळीमुळे शासकीय कार्यालयांत सुटीचा फीव्हर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; आनंदाचा उत्सव दिवाळी पर्वाला उत्साहात प्रारंभ झाला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना शुक्रवार (दि. १०) पासून सलग तीन दिवस सुट्या आल्याने शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे. दरम्यान, सोमवारी (दि. १३) कार्यालये उघडणार असली, तरी पुढील दोन दिवस सुटी असणार आहे.

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे. शासकीय कार्यालयांमध्येही सणाचा फीव्हर आहे. विभागीय आयुक्त स्तरावरून धनत्रयोदशीची सुटी शुक्रवारी (दि. १०) घोषित करण्यात आली. त्यानंतर शनिवार आणि रविवार जाेडून आल्याने तीन दिवस शासकीय कार्यालयांचे कामकाज थंडावले आहे. सलग सुटीमुळे जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयात एरव्हीसारखी गर्दी दिसून आली नाही. महापालिका, जिल्हा परिषदेसह अन्य शासकीय कार्यालयांतही शुकशुकाट नजरेस पडत आहे.

दरम्यान, सोमवारी (दि. १३) दिवाळीचा कोणताही सण नसल्याने कार्यालये नियमित सुरू राहतील. पण मंगळवारी (दि. १४) पाडवा तसेच बुधवारी (दि. १५) भाऊबीजेची सुटी असल्याने बहुतांश जणांनी सोमवारी रजा काढली आहे. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कार्यालयांमध्ये तुरळक गर्दी राहण्याची शक्यता आहे. एकूणच हा आठवडा सुट्यांमध्ये जाणार असल्याने पुढील गुरुवार (दि. १६)पासून कार्यालये गजबजणार आहेत.

अधिकारी-कर्मचारी दालनात

दिवाळीच्या सलग सुट्या लागून आल्या असल्या, तरी जिल्हाधिकारी कार्यालयांमधील काही दालनांत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (दि. १०) हजेरी लावली. हे अधिकारी व कर्मचारी दिवसभर मराठा-कुणबी नोंदी शोधण्यामध्ये व्यग्र होते. असेच काहीसे चित्र जिल्हा परिषद, पंचायत समित्या तसेच शाळांमध्येही पाहायला मिळाले.

हेही वाचा :

The post दिवाळीमुळे शासकीय कार्यालयांत सुटीचा फीव्हर appeared first on पुढारी.

Exit mobile version