धुळे : मातृभाषेला जीवनात महत्वाचे स्थान; जिल्हाधिकारी जलज शर्मा

धुळे; पुढारी वृत्तसेवा : भाषेच्या माध्यमातून आपल्या भावना शब्दातून व्यक्त केल्या जातात, त्या समोरील व्यक्तीपर्यंत पोहोचतात. त्यामुळे भाषेला जीवनात महत्त्वाचे स्थान आहे, त्यातही मातृभाषेला सर्वाधिक महत्त्व आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले.

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या सांगता सोहळ्यानिमित्त जिल्हा मराठी भाषा समिती, शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग व विद्यावर्धिनी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, महानगरपालिकेचे आयुक्त देविदास टेकाळे, विद्यावर्धीनी कौन्सिलचे चेअरमन अक्षय छाजेड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवेंद्र विसपुते, शिक्षणाधिकारी मोहन देसले, भाषा समितीचे अशासकीय सदस्य प्रा. जसपालसिंग सिसोदिया, प्रा. दत्तात्रय परदेशी, रोहिदास हाके आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले की, केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर केडर अलोकेट होत असताना त्या-त्या प्रांताची भाषा तीन महिन्यांमध्ये शिकण्याचे आव्हान असते. त्यामुळे आजही मराठी भाषा शिकण्याची प्रक्रिया चालू आहे. भाषेचे ज्ञान हे नागरिकांच्या समस्या समजून घेताना उपयुक्त ठरत असते. मातृभाषा सोबत इंग्रजी तसेच इतर भाषाही शिकण्याची तयारी विद्यार्थ्यांनी ठेवावी.

पोलीस अधीक्षक बारकुंड यांनी सांगितले की, आपल्यापैकी कोणीही मातृभाषा मराठीला विसरता कामा नये. मातृभाषेचा म्हणजे मराठीचा उपयोग व्यवहारात करण्यात तसेच आपल्या अभिव्यक्तीसाठी करण्यास महत्त्व द्यायला हवे असे त्यांनी सांगितले.

शिक्षणाधिकारी मोहन देसले यांनी गेल्या मराठी भाषा पंधरवडानिमित्त गेल्या पंधरा दिवसात राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी कलाशिक्षक राजेंद्र भदाणे, गणेश फुलपगारे, किरण मांडे, केदार नाईक, बी. सी. पाटील, मिलिंद अमृतकर, विशाल ठाकरे, पंजाबराव व्यास यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा

The post धुळे : मातृभाषेला जीवनात महत्वाचे स्थान; जिल्हाधिकारी जलज शर्मा appeared first on पुढारी.