धुळे : समारंभात पुष्पगुच्छ न वापरता बचतगट उत्पादित बास्केट गिफ्ट द्या – बुवनेश्वरी एस

dhule

धुळे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत धुळे जिल्ह्यात महिलांची उपजिविका वाढविण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शासकीय कार्यक्रम, समांरभांमध्ये स्वागतासाठी पुष्पगुच्छ, पुष्पहार न वापरता उमेद अभियानातील ग्रामीण महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांच्या गिप्ट बास्केटचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा अभियान संचालक बुवनेश्वरी एस. यांनी जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांना लेखी पत्राव्दारे  केले आहे.

ग्रामीण भागातील समूहातील महिलांना स्थानिक स्तरावर बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी विविध स्तरावर स्टॉल लावणे, जिल्हा विभाग व राज्य पातळीवर होणाऱ्या विविध प्रदर्शनांमध्ये सहभाग नोंदविणे अशा बाबी राबविल्या जातात. ग्रामीण महिलांनी तयार केलेले उत्पादने उत्कृष्ट व चांगल्या दर्जाची असुन ही विविध उत्पादने एकत्र करुन त्यांची एक गिफ्ट बास्केट तयार करण्यात आली असून अत्यंत वाजवी दरात उपलब्ध असणार आहे.

दैनंदिन वापराच्या निवडक विविध उत्पादनांचे तीन प्रकारचे गिफ्ट बास्केट तयार करण्यात आले आहे. यात नागली पापड, टोमॅटो पापड, पालक पापड, तांदूळ पापड, कुरडाई, साबुदाणा चकली असून याची किंमत ५०० रुपये आहे. तर आवळा चटपट मुखवास, आवळा चूर्ण, आवळा स्विट कॅण्डी, आवळा ईमली गटागट, आवळा खट्टीमिट्टी कॅण्डी, आवळा चटपट कॅण्डी, आवळा स्वादिष्ट सुपारी, आवळा व्यसनमुक्ती कॅण्डी, आवळा जेट ईमली या पॅकची किंमत ६०० रुपये आहे. तर गरम मसाला, हळद पावडर, मिरची पावडर, रोस्टेड गहू, रोस्टेड सोयाबीन, रोस्टेड ज्वारी या पॅकची किंमत अवघी ३५० रुपये इतकी आहे.

जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुख यांनी यापुढे आपल्याकडील शासकीय समारंभात या गिफ्ट बास्केटचा वापर करुन बचत गटातील महिलांची उपजिविका बळकट करण्यासाठी सहकार्य करावे. यासाठी जितेंद्र चौधरी, जिल्हा व्यवस्थापक यांच्याशी संपर्क करावा, असेही आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी केले आहे.

          हेही वाचलंत का ? 

 

The post धुळे : समारंभात पुष्पगुच्छ न वापरता बचतगट उत्पादित बास्केट गिफ्ट द्या - बुवनेश्वरी एस appeared first on पुढारी.