नंदुरबार : अतिक्रमण हटाव सुरू; प्रशासकीय कारभाराचा दणका

नंदुरबार, पुढारी वृत्तसेवा :  नंदुरबार नगर परिषदेच्या प्रशासनाने दीर्घ प्रतीक्षेनंतर का होईना अतिक्रमण हटाव मोहिम सुरू केली आहे. गुरुवारी (दि.२७) दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान नंदुरबार नगर परिषदेचे प्रशासक पुलकित सिंह यांनी अचानक मोहिमेचा प्रारंभ केला.  नंदुरबार पंचायत समिती परिसरातील व शहराच्या मध्यवर्ती भागातीलही काही अतिक्रमित टपऱ्या हटवल्या.

अतिक्रमण हटाव मोहिमेच्या या पहिल्या टप्प्यातच सत्ताधारी गटाच्या एका नगरसेवकाला फटका बसला असून अतिक्रमण हटाव मोहिम पुढे आणखी कोणता रंग धारण करते? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. आपणच शहराचे मालक; अशा भूमिकेत येऊन अनेक राजकीय महाभाग नंदुरबार शहरातील रस्ते व्यापणारे अतिक्रमण बिनधास्तपणे अनेक वर्षापासून करून बसले आहेत. डोळ्यादेखत जाहिरपणे दिसणारी अशी अनेक कायदेबाह्य बांधकामे शहरवासीयांच्या चर्चेचा विषय आहेत. मात्र, आज अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम स्टेट बँक चौक पासून अमर थिएटरकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंतच्या अशा बहुचर्चित अतिक्रमणाला उखडून टाकत प्रशासनाने दणका दिला. पंचायत समितीच्या शासकीय कार्यालयाला देखील अतिक्रमणाचा विळखा बसला होता. आज काही प्रमाणात ते मोकळे झालेले दिसले.

शहरातील रस्ते आधीच अरुंद आहेत. त्यात वाहनांची संख्या वाढत आहे. अशा रस्त्यांवर अतिक्रमण वाढल्याने रहदारीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेता पोलिस दल तसेच वाहतूक शाखेने पालिकेला वेळोवेळी पत्र देऊन रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्याची मागणी केली होती. परंतु सत्ताधारी किंवा विरोधकही त्याबाबत फारसे गांभीर्याने घेत नव्हते. विद्यमान स्थितीत प्रशासकांच्या हाती सूत्र असल्यामुळे अतिक्रमण हटावचा विषय अजेंड्यावर आला. प्रशासक पुलकित सिंह यांनी प्राधान्याने नंदुरबारचे रस्ते व्यापणाऱ्या अवैध बांधकामांना हटवण्याचा निर्णय घेतला. त्याचाच भाग म्हणून मागील दोन आठवड्यांपासून पालिकेकडून अतिक्रमण काढण्याबाबत नोटिसांचे सत्र सुरू होते. प्रत्यक्षात अतिक्रमण कधी काढले जाईल, याबद्दल लोक तरीही साशंकच होते. परंतु पुलकित सिंह यांनी आज खरोखरचा दणका दिला आणि राजकीय मुलाहिजा न ठेवता यशवंतराव चव्हाण कॉम्प्लेक्स च्या मागील बाजूस केलेले शेडचे अवैध बांधकाम तसेच तिथून पुढे देसाईपूरकडे जाणारा रस्त्यावरील कॉम्प्लेक्सचे अतिक्रमित बांधकाम तोडण्यात आले.

हेही वाचंलत का?

The post नंदुरबार : अतिक्रमण हटाव सुरू; प्रशासकीय कारभाराचा दणका appeared first on पुढारी.