नंदुरबार : शिवसेनेचा दणदणीत विजय; चार पैकी तीन समित्यांमध्ये भाजपाचा पराभव

नंदुरबार, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील चार कृषी उत्पन्न बाजार समितींपैकी केवळ एक समिती भाजपाच्या हाती लागली असून अन्य तीन ठिकाणी केवळ अंतर्गत गटबाजीमुळे भाजपला पराभव पत्करावा लागला आहे. नंदुरबार येथील लक्षवेधी ठरलेल्या लढतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेने संपूर्ण जागा जिंकून भाजपाला पराभूत केले. हे या निवडणुकीतील विशेष ठरले.

तळोदा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक या आधीच तेथील विद्यमान भाजपाचे आमदार राजेश पाडवी यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध करण्यात आली आहे. यामुळे प्रत्यक्षात नंदुरबार नवापूर आणि शहादा या तीन तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यांचा निकाल आज जाहीर करण्यात आला. यात नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणूक सर्वात लक्षवेधी ठरलेली होती. भाजपाचे आमदार तथा राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित व खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या पॅनल विरोधात एकनाथराव शिंदे गटाच्या शिवसेनेचे जिल्हा नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या पॅनलची सरळ लढत होती. 18 पैकी 18 जागा जिंकून शिंदे गटाच्या शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दणदणीत विजय प्राप्त केला. हे सर्वांनी काल सायंकाळपर्यंत जाहीर झाल्यावर आमदार कार्यालयाबाहेर प्रचंड जल्लोष करण्यात आला.

रघुवंशी यांना वीस वर्षापासूनचे वर्चस्व राखण्यात यश मिळाले. “मतदारांनी सत्तेचा माज उतरवला. विकासरत्न आणि संसद रत्न आमच्या विरोधात असूनही आणि पैशाची ताकद लावलेली असतानाही हरवू शकले नाही जनमताने आम्हाला कौल दिला यावर त्यांनी आत्म संशोधन करावे” अशा शब्दात चंद्रकांत रघुवंशी यांनी विजय प्राप्ती विषयी प्रतिक्रिया व्यक्त केली. तर आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी ‘मतदारांचा कौल आम्हाला मान्य आहे. यशाची अपेक्षा असताना झालेला पराभव आम्ही स्वीकारला आहे. पक्षांतर्गत गटबाजीचा परिणाम असावा” असे मत व्यक्त केले.

या खालोखाल शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत लक्षवेधी लढत रंगली. आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वाखालील पॅनल विरोधात त्यांचेच समर्थक असलेले दीपक बापू पाटील आणि भाजपाचे आमदार राजेश पाडवी यांनी मिळून स्वतंत्र पॅनल उभे केले होते. त्याचबरोबर शेतकरी नेते अभिजीत पाटील यांनी सुद्धा तिसरे पॅनल उभे करून दोघांची लढत दिली. परिणामी या तिरंगी लढतीत भाजपाने त्यांची संबंधित असलेले दोन्ही पॅनल पूर्णतः पराभूत झाले तर अभिजीत पाटील यांच्या पॅनलने दणदणीत विजय प्राप्त केला.

नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १७ पैकी अकरा जागांवर काँग्रेस पक्ष पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार निवडून आले. काँग्रेसचे नवापूर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार शिरीष नाईक यांना पारंपारिक वर्चस्व कायम राखण्यात या माध्यमातून यश मिळाले आहे. तथापि भाजप पुरस्कृत शेतकरी परिवर्तन विकास पॅनलला सहा जागांवर समाधान मानावे लागले. भारतीय जनता पार्टीच्या येथील पॅनलचे नेतृत्व आदिवासी साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित यांनी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या मार्गदर्शनाखाली केले.

हेही वाचलंत का?

The post नंदुरबार : शिवसेनेचा दणदणीत विजय; चार पैकी तीन समित्यांमध्ये भाजपाचा पराभव appeared first on पुढारी.