नाशिक : कंटेनरखाली दबून मायलेकांचा मृत्यू; अपघातानंतर १२ तासांनी घटनेचा उलगडा

नाशिक

सिन्नर (नाशिक); पुढारी वृत्तसेवा : सिन्नर – घोटी महामार्गावर शिव नदीवरील पुलाच्या वळणावर उलटलेल्या कंटेनरखाली दबून सोनांबे येथील मायलेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.१५) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. बिलकिस हमीद शेख (वय ३४) आणि आरमान हमीद शेख (वय १९) अशी अपघातात ठार झालेल्या मायलेकांची नावे आहेत.

तालुक्यातील सोनांबे येथील मायलेक सिन्नरहून घरी परतले नसल्याची बाब समोर आल्यानंतर त्यांचे मोबाईल लोकेशन चेक केल्यावर ते वळणावर उलटलेल्या कंटेनरखाली दबले गेल्याची धक्कादायक बाब समोर आली. या घटनेत अपघातानंतर चालक फरार झाल्याने प्रारंभी केवळ कंटेनर उलटला असल्याचे आणि त्यात कुठलीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहचली होती.

दरम्यान, शुक्रवारी पहाटे ४ वाजता मायलेकाचे मृतदेह कंटेनर खालून बाहेर काढण्यात आला. हे दोघे दुचाकी (एमएच-१५, बीएफ -४९१९) वरून गुरुवारी दुपारी सिन्नर येथे बाजारासाठी आले होते. घरी परतताना त्यांनी कुटुंबीयांना सिन्नर येथून निघाल्याचे मोबाईलवरून सांगितले होते. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने कुटुंबातील सदस्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी त्यांचा मोबाईल ट्रॅक केला असता रात्री १० वाजेच्या सुमारास मोबाईलचे लोकेशन शिवनदीच्या वळणावर उलटलेल्या कंटेनरच्या परिसरात मिळाले. पोलिसांचा संशय बळावला.‌ दुचाकी या कंटेनरखाली दाबली असावी, असा संशय व्यक्त करत पोलिसांनी तपास कार्याला सुरुवात केली.

उशिरा अपघातस्थळी क्रेन बोलावून कंटेनर आणि त्यातून पडलेले पुठ्ठ्याचे गठ्ठे बाजूला करण्याचे काम हाती घेतले. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास या कंटेनरखाली दुचाकीसह दोघा मायलेकांचे मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे सोनांबे परिसरात हळहळ पसरली आहे.

अधिक वाचा :

The post नाशिक : कंटेनरखाली दबून मायलेकांचा मृत्यू; अपघातानंतर १२ तासांनी घटनेचा उलगडा appeared first on पुढारी.