नाशिक : गणेशनगर भागात बंद घराचे कुलूप तोडून सहा लाखांची चोरी

चोरी

कळवण; पुढारी वृत्तसेवा : कळवण शहरातील कुलस्वामिनी कॉलनीतील बंद घराचे कुलूप तोडून सहा लाखांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली. बापूसाहेब भिला खैरनार यांच्या घरात ही चोरी झाली. याबाबत कळवण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील गणेश नगर भागातील कुलस्वामिनी कॉलनीत राहणारे बापूसाहेब भिला खैरनार हे मानूर येथे दशक्रिया विधीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. तसेच पत्नी शिक्षिका असल्याने पाळे येथे शाळेत गेल्या होत्या, तर मुलगा मानूर येथे कॉलेजला गेला होता. दुपारी १२ ते १ वाजताच्या सुमारास बंद घराचे कुलूप तोडून चोरटयांनी सहा लाखांचे सोने व चांदीचे दागिने आणि ७० हजार रोख रक्कमेवर डल्ला मारला. खैरनार हे दुपारी १ वाजताच्या सुमारास घरी परत आल्यानंतर त्यांना लोखंडी गेट बंद होता परंतु लाकडी दरवाजा अर्धवट उघडा असल्याचे आढळून आले. त्यांनी घरात जाऊन पहिले असता घरातील लोखंडी दरवाजा उघडा होता. व कपाटातील सामान अस्थाव्यस्त पडलेले होते. त्यांच्या लक्षात आले की, त्यांच्या घरी चोरी झालेली आहे. याबाबत त्यांनी कळवण पोलीस ठाण्यात माहिती दिली.

चोरीच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी नाशिक येथून श्वान पथक व हाताचे ठसे घेणाऱ्या पथकाला पाचारण करण्यात आले होते. श्वान पथकाने स्टेट बँक चौकीपर्यंतच मार्ग दाखवला आहे. त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आवाहन ठाकले आहे. कळवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान नागरी यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून पुढील तपास कळवण पोलीस करीत आहेत.

कळवण तालुक्यातील अभोणा येथे गेल्या चार दिवसापूर्वी एकाच रात्री सहा ठिकाणी चोरटयांनी हात साफ करीत जवळपास ९ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. हि घटना ताजी असून व या चोऱ्यांचा छडा लावण्यास यश आलेले नसतांना आज कळवण शहरात दिवसा धाडसी चोरी झाल्याने पोलिसांसमोर मोठे आवाहन उभे राहिले आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा

The post नाशिक : गणेशनगर भागात बंद घराचे कुलूप तोडून सहा लाखांची चोरी appeared first on पुढारी.