नाशिक : चक्क वीज कंपनीचा रोहित्रच चोरीला; अर्धे गाव अंधारात

चांदवड; पुढारी वृत्तसेवा : आजवर तुम्ही चोरट्यांनी घर फोडल्याचे, दुकान फोडल्याचे किंवा गाडी चोरल्याचे ऐकले असेल. मात्र चोरट्यांनी घर, दुकान किंवा गाडी न चोरता चक्क गावाला वीज पुरवठा करणारा वीज वितरण कंपनीचा रोहीत्रच चोरून नेल्याची घटना चांदवड तालुक्यातील राहूड गावात घडली आहे. विशेष म्हणजे या गावात एकदा नव्हे दोनदा नव्हे तर चौथ्यांदा हा रोहित्र चोरट्यांनी चोरून नेला आहे. यामुळे अर्धे राहूड गाव दोन दिवसापासून अंधारात सापडले आहे. लाईट अभावी गावात पाणी पुरवठा करता येत नसल्याने ग्रामपंचायती समोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

तालुक्यातील राहूड गावातील खरोटा मळा येथे वीज वितरण कंपनीचा २०० केव्हीचा रोहित्र बसवला आहे. या रोहीत्रामार्फत गावाला वीज पुरवठा केला जातो. राहूड गावातून गेलेल्या मुंबई आग्रा महामार्गा लगद हा रोहित्र असल्याने रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी हा रोहित्र रविवारी (दि.२८) चोरून नेला आहे. रोहित्र चोरी गेल्याने अर्ध्या गावातील बत्ती गुल झाली आहे. यामुळे रात्रीपासून अर्धेगाव अंधारात आहे. यापूर्वी देखील हा रोहित्र मार्च २०२०, फेबुवारी २०२२, सप्टेंबर २०२२ रोजी चोरीला गेला आहे. याबाबत चांदवड पोलिसात तक्रार देखील केली होती. मात्र अद्यापपर्यंत चोर आणि रोहित्र दोन्ही सापडले नाहीत. असे असताना अज्ञात चोरट्यांनी रविवारी (दि.२८) मध्यरात्री चौथ्यांदा हा रोहित्र चोरून पोबारा केला आहे. रोहित्र मोठा असल्याने त्यातील ऑईल, कॉपर विकून चोरट्यांना पैसे मिळत असावेत असा अंदाज आहे. यासाठी ते हा रोहित्र वारंवार चोरून नेत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अज्ञात चोरट्यांच्या या धाडसी चोरीमुळे राहूड गाव मात्र अंधारात सापडले आहे. चोरीला गेलेल्या रोहीत्राचा तपास करण्यात यावा यासाठी माजी सैनिक तथा ग्रामपंचायत सदस्य वाल्मिक पवार, मधुकर निकम, पांडुरंग पवार, भूषण पवार, बाळू गांगुर्डे, शंकर पवार आदींनी आमदार डॉ.राहुल आहेर यांची भेट घेत रोहित्र चोरीला गेल्याची माहिती दिली. यावेळी आमदार डॉ. आहेरांनी त्वरित नवीन रोहित्र बसवून देण्याच्या सूचना उपकार्यकारी अभियंता उमेश पाटील यांना दिल्या आहेत. तसेच चोरीला गेलेल्या रोहीत्राचा तपास करून त्वरित अज्ञात चोरट्यांना अटक करण्याचे आश्वासन पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी राहूडकरांना दिले आहे.

The post नाशिक : चक्क वीज कंपनीचा रोहित्रच चोरीला; अर्धे गाव अंधारात appeared first on पुढारी.