नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर गुटख्याची तस्करी; ७२ लाखांचा मुद्देमाल जप्त

धुळे; पुढारी वृत्तसेवा : मुंबई आग्रा महामार्गावरून तंबाखू आणि गुटख्याची तस्करी करण्याचा प्रकार तालुका पोलीस पथकाने हाणून पाडला आहे. या कारवाईत तब्बल 72 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई आग्रा महामार्गावरून मालेगाव शहराच्या दिशेने गुटख्याची तस्करी होणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी महामार्गावरील शेरे पंजाब ढाब्याजवळ सापळा रचला. यावेळी पोलीस पथकाने धुळे शहराकडून येणारी ट्रक (एम एच 18 बी जी 73 08) अडवला. पोलिसांनी आयशर अडवल्याचे पाहताच गाडीतील चालकाने अंधारात उडी टाकून धूम ठोकली. दरम्यान पोलिसांनी हा ट्रक धुळे तालुक्यातील आर्वी येथील पोलीस आऊट पोस्ट येथे आणून तपासणी केली. यावेळी त्यामुध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा तसेच तंबाखूचा मोठा साठा आढळून आला. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 72 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या संदर्भात अन्न आणि औषध विभागाचे किशोर बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गाडीचा चालक पंकज पाटील यांच्या विरोधात अन्नसुरक्षा मानके कायदा 2006 चे कलम 26 (2), (4 ),कलम 27( 3) (ड) कलम 27 (इ) तसेच भादवि कलम 188 ,272 ,273, 328 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या गाडीचा मालक, गुटख्याचा पुरवठादार तसेच तसेच खरेदीदार यांच्यावर देखील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.

The post नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर गुटख्याची तस्करी; ७२ लाखांचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.