नाशिक : विसर्जनात विघ्न! बाप्पांची सव्वा किलो चांदीची मूर्ती चोरीस

नाशिक : विसर्जनात विघ्न! बाप्पांची सव्वा किलो चांदीची मूर्ती चोरीस

वावी (ता. सिन्नर), पुढारी वृत्तसेवा : येथील बसस्थानक परिसरातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर स्थापन करण्यात आलेल्या इच्छामणी व्यापारी गणेश उत्सव मित्र मंडळाची चांदीची अंदाजे सव्वा किलो वजनाची गणेश मूर्ती विसर्जनाच्या पहाटेच चोरी गेल्याने वावीसह परिसरात एकच खळबळ उडाली.

इच्छामणी व्यापारी गणेश उत्सव मंडळाचे गेल्या 14 वर्षापासून स्थापना झाली असून आठ वर्षापूर्वी चांदीच्या गणपती बाप्पाची मूर्ती मंडळाच्या वतीने प्राणप्रतिष्ठा करून ठेवण्यात आली. त्यामध्ये त्यामध्ये दरवर्षी भर टाकून आज रोजी बाप्पांची मूर्ती सव्वा किलोची होती, असे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.

विसर्जनाच्या पहाटे मंडळाची लाईट ऑफ करण्यासाठी कार्यकर्ता आला असता चोरीचा प्रकार लक्षात आला. तात्काळ वावी पोलिसांशी संपर्क साधून तक्रार देण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या सूचनेनुसार येथील गणेशोत्सव मंडळाच्या चोरी गेलेल्या चांदीच्या मूर्तीची वावी पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आली. वावी येथील तीन ते चार संशयीतांना ताब्यात घेण्यात आले. मात्र कुठलाही सुगावा लागला नसल्याचे समजते. घटनास्थळावर पोलीस उपाधीक्षक सोमनाथ तांबे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक नाना शिरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली आठ जणांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

डॉग स्कॉड पथकास पाचारण केले होते परंतु अजून तपास सुरूच आहे. या मंडळाला गेली नऊ दिवस पोलिसांनी होमगार्ड च्या साह्याने बंदोबस्त दिला होता. तरीही चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान ग्रामपंचायत कार्यालयाचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी करत असून या चोरीचा लवकरात लवकर छडा लावण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

The post नाशिक : विसर्जनात विघ्न! बाप्पांची सव्वा किलो चांदीची मूर्ती चोरीस appeared first on पुढारी.