नाशिक : २० हजारांची लाच घेताना तलाठ्याला अटक; लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

इगतपुरी, पुढारी वृत्तसेवा : इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव व मुरंबी येथील तलाठी सचिन काशिनाथ म्हस्के, वय ३८ याला २० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधकाच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तलाठी सचिन म्हस्के यांनी तक्रारदार यांच्याकडे महसुली ७/१२ अभिलेखावर नोंद करून देण्याच्या मोबदल्यात २० हजार रुपये लाच स्वीकारल्याने लाच लुचपत प्रतिबंधक नाशिक विभागाने गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. यामुळे महसुली विभागात खळबळ उडाली आहे.

यातील तक्रारदार व त्यांचे इतर ३ भागीदार यांनी मिळून इगतपुरी तालुक्यात मुरंबी गाव येथे जमीन खरेदी केली आहे. सदर जमिनीच्या गाव नमुना ७/१२ महसूल अभिलेखावर् नोंद करून देण्याच्या मोबदल्यात लोकसेवक तलाठी सचिन काशिनाथ म्हस्के यांनी २० हजार रुपये लाचेची मागणी करून शनिवार दि. १ रोजी २० हजार रुपये पंच साक्षीदार यांचे समक्ष स्वीकारले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक संदीप घुगे, एकनाथ बाविस्कर, प्रकाश महाजन, नितीन नेटारे हे पथक उपस्थित होते. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

हेही वाचलंत का?

The post नाशिक : २० हजारांची लाच घेताना तलाठ्याला अटक; लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई appeared first on पुढारी.