Site icon

नाशिक l शेतात गारांचा सडा; कांदा, पपई, द्राक्षपिके भुईसपाट

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; चांदवड तालुक्यात रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस अन् जोरदार गारपिटीने कांदा, द्राक्ष पिके अक्षरश: भुईसपाट झाली. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांनी जगविलेल्या कांदा, द्राक्षबागा अक्षरशः होत्याच्या नव्हत्या झाल्या आहे. यामुळे तालुक्यातील कांदा, द्राक्ष उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा निसर्गाच्या प्रकोपामुळे आर्थिक संकटात सापडला आहे.

हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्याचे क्षेत्र निर्माण झाल्याने गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हिमालयाकडून बाष्पयुक्त वारे मध्य प्रदेश, महाराष्ट्रातून पश्चिम किनारपट्टीकडे वाहत आहे. त्यामुळे ढगाळ वातावरण झाले आहे. रविवारी सकाळपासूनच सूर्यदर्शनच झाले नव्हते. दुपारी ३.३० च्या सुमारास वातावरणात काळेकुट्ट ढग गोळा होऊन विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस अन् गारपिटीला सुरुवात झाली. या अवकाळी पावसामुळे काढणीस आलेला लाल कांदा, द्राक्षपिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.

चालू वर्षी दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांनी पाण्याची बचत करीत थोड्याफार प्रमाणात कांदा पिकांची लागवड केली आहे. हे कांदे काढणीस आले आहे आणि त्याला बऱ्यापैकीही दर मिळत आहे. या कांद्यापासून शेतकऱ्यांना दोन पैसे मिळण्याची अपेक्षा असताना अवकाळीने तडाखा दिल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. त्याचप्रमाणे द्राक्षबागांचे नुकसान होणार आहे. दुष्काळसदृश परिस्थितीमुळे चालू वर्षी शेतकऱ्यांनी पाणी विकत घेत द्राक्ष, डाळिंब बागांची लागवड केली आहे. या बागांचे प्रचंड नुकसान होत आहे.

तालुक्यातील तळेगावरोही, वडगावपंगू, काळखोडे, वाकी गावच्या पंचक्रोशीत वादळी वाऱ्यासह अर्धा तास जोरदार गारपीट झाल्या. या गारा चक्क चिकूच्या आकाराच्या असल्याने कांदा, द्राक्ष, मिरची, टोमॅटो पिकांचे पूर्णतः होत्याचे नव्हते केले आहे. गारांमुळे पत्रांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. कांदा पिकाचे चर पूर्णतः भुईसपाट झाले आहे. तर द्राक्षबागा पूर्णतः झडून गेल्या आहेत. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी पूर्णतः कोलमडला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक l शेतात गारांचा सडा; कांदा, पपई, द्राक्षपिके भुईसपाट appeared first on पुढारी.

Exit mobile version