मुख्यमंत्री पदासाठी गिरीश महाजनांना माझा पाठिंबा: एकनाथ खडसेंचं विधान

एकनाथ खडसे

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री पदासाठी काही निकष असतात. कार्यक्षम, दूरदृष्टीचा आणि सामाजिक हिताचा निकष पूर्ण करणारा मुख्यमंत्री असेल तर मी गिरीश महाजन यांनाही मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा देऊ शकतो, असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केले आहे.

जळगाव येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना खडसे म्हणाले, “सुरेश दादा जैन हे मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी मी स्वतः बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती. मला जो मुख्यमंत्री पाहिजे, तो कार्यक्षम, चांगला, दूरदृष्टी आणि सामाजिक हित जपणारा पाहिजे. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने त्याने केलेल्या आतापर्यंतच्या कामाचा आढावा घेतला, तर त्यांचं स्थान वरचं असलं पाहिजे. अशा निकषांमध्ये बसणारा माणूस मला मुख्यमंत्री म्हणून पाहिजे. या निकषांमध्ये गिरीश महाजन बसत असतील, तर मला काहीही अडचण नाही. या भागातील प्रकल्प मंजूर करण्यासाठी कुणीही तयार झाला, तर त्या व्यक्तीला माझा पाठिंबा आहे.”

खानदेशाच्या विकासाला प्राधान्य

आपल्या परिसरात विद्यापीठ, पशुवैद्यकीय महाविद्यालय यासह सिंचनासाठी निधी मिळावा. खानदेशाच्या विकासासाठी पैसा मिळावा. आपला परिसर सुजलाम् सुफलाम् व्हावा, असं स्वप्न आम्ही वर्षानुवर्षे पाहत आलो आहोत. ज्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली, ते प्रकल्प पूर्ण करावेत, अशी आमची अपेक्षा आहे. हे काम करणारा नेता माझा कितीही कट्टर शत्रू असला तरी मुख्यमंत्री पदासाठी माझा त्यांना पाठिंबा असेल, असं मत खडसेंनी व्यक्त केलं.

खडसे यांना मोठा दिलासा

भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणी उच्च न्यायालयाने एकनाथ खडसे यांना मोठा दिलासा दिला. याप्रकरणी चौकशी करा, मात्र या प्रकरणात आता चार्ज शीट किंवा अटक करता येणार नसल्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. याप्रकरणी चौकशी पूर्ण झालेली असताना एकाच विषयाची इतक्या वेळेस चौकशी करून देखील काहीही सापडत नाही. भोसरी भूखंड प्रकरणी असलेला एफआयआर रद्द करावा, अशी मागणी एकनाथ खडसेंनी उच्च न्यायालयाकडे केली होती. यावर उच्च न्यायालयाने हा निर्णय देत खडसेंना दिलासा दिला आहे.

अधिक वाचा :

The post मुख्यमंत्री पदासाठी गिरीश महाजनांना माझा पाठिंबा: एकनाथ खडसेंचं विधान appeared first on पुढारी.