येवल्यातील सभा ठरणार शरद पवारांसाठी निर्णायक

शरद पवार

नाशिक, प्रताप म. जाधव : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुनर्बांधणीला प्रारंभ करण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी येवल्यात शनिवारी (दि. 8) आयोजित केलेली सभा जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातही पक्षाचे भवितव्य ठरवणारी असेल. अनुकूल-प्रतिकूल वेळी पवारांना साथ देणारे नाशिक जिल्ह्यातील कार्यकर्ते यावेळी पुन्हा एकदा ठामपणे पवारांच्या पाठीशी राहतील का, हेही त्यावेळी स्पष्ट होणार आहे.

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सुरुंग लावत गेल्या रविवारी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा राज्यात झालेल्या राजकीय घडामोडींनी सर्वांनाच धक्का बसला. त्यांच्या समवेत छगन भुजबळ यांनीही मंत्रिपदाची शपथ घेत भाजपच्या जोडीनेे सत्तेत सहभागी होणे जास्त धक्कादायक ठरले. पक्षाचे कालपर्यंतचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही ही गोष्ट जास्त खटकली असावी. म्हणूनच, त्यांनी पक्षाच्या पुनर्बांधणीला प्रारंभ करण्यासाठी भुजबळांच्या येवल्याची निवड केलेली दिसते.

भुजबळ यांच्या राजकीय कारकिर्दीतील हे दुसरे बंड. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मतभेद झाल्यानंतर 1991 मध्ये त्यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 1995 च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील माझगाव मतदारसंघात पराभव पत्करावा लागल्यानंतर त्यांनी आजोळी, म्हणजे नाशिकमध्ये बस्तान बसवण्याचा निर्णय घेतला आणि तो योग्यही ठरला. कारण, येथूनच त्यांची राजकीय कारकीर्द फुलत गेली. 1999 मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर त्यांनी पवारांचा हात धरला तो अगदी परवाच्या रविवारपर्यंत.

या काळात त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रथम प्रदेशाध्यक्षापासून सरकारमध्ये उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, सार्वजनिक बांधकाममंत्री, अन्न व नागरी पुरवठामंत्री अशी पदे भूषवली. त्यांचे पुतणे समीर भुजबळ हेही एकदा नाशिकमधून लोकसभेवर निवडून गेले. मात्र, स्वत: भुजबळ व नंतर समीर यांनाही एकदा लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये पराजय पाहावा लागला.

नाशिक लोकसभा म्हणा किंवा महापालिका येथे फारसा जम बसत नसताना येवला विधानसभा मतदारसंघावर असलेली पकड मात्र भुजबळ यांनी कधीही ढिली पडू दिली नाही.

भुजबळांचे प्राबल्य राहील का?

राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार यांनी स्वत: मुंबईत बोलावून घेतलेेले माणिकराव शिंदे हे एकमेव प्रमुख विरोधक आज भुजबळांना येवल्यात आव्हान देत आहेत. 8 जुलै रोजी होणार्‍या पवारांच्या सभेची सर्व जबाबदारी शिंदे यांच्या खांद्यावर आहे. या सभेच्या यशापयशावरूनच भविष्यात भुजबळांचा येवल्यातील मार्ग आतापर्यंत राहिला तसा निष्कंटक राहील, की शिंदे व अन्य विरोधक या मार्गात अडथळे आणण्याची क्षमता दाखवतील, याचा अदमास येणार आहे.

गटांची झाली फेररचना

जिल्हा राष्ट्रवादीत मुळात भुजबळ व अजित पवार असे दोन गट होते. त्यांच्यात उघड असा संघर्ष कधी झाला नाही; पण शरद पवार यांनी नाशिकबाबतचे सर्वाधिकार भुजबळांना दिलेले असल्याने अजित पवार यांच्या समर्थकांमध्ये सुप्त नाराजी असायची. मात्र, नव्या जुळणीत अजित पवार व भुजबळ गट एक झाले आहेत. तर अजित पवार यांना मानणारी; पण भुजबळांशी फारसे न पटणारी मंडळी थोरल्या पवारांशी निष्ठावंत झाली आहे. त्याचाच परिपाक मंगळवारी राष्ट्रवादी भवनाच्या ताब्यावरून धुमश्चक्री उडण्यात झाला.

The post येवल्यातील सभा ठरणार शरद पवारांसाठी निर्णायक appeared first on पुढारी.