Site icon

लग्नानंतरही सुरु ठेवला अभ्यास, गोडसे परिवाराची सून झाली CA

देवळाली कॅम्प(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा– सोनाली गणेश गोडसे या शेतकरी कन्येने ‘सनदी लेखापाल’ या पदाला गवसणी घालत उत्तुंग यश संपादन करताना गोडसे परिवारातील पहिली महिला सीए होण्याचा सन्मान प्राप्त केला. सोनाली मूळची पिंपळगाव बसवंत येथील आहे. मराठी शाळेतून शिक्षण घेतलेल्या आणि लग्न झाल्यानंतर येथील गोडसे परिवाराची सून झालेल्या सोनालीने आपले शिक्षण सुरू ठेवत जिद्द आणि कष्टाच्या जोरावर सीएसारख्या कठीण परीक्षेची तयारी केली.

सोनालीचे पती गणेश इंजिनिअर आहेत. तिने लग्नागोदर इंटर व आर्टिकलशिप पूर्ण केली होती. फायनलचे दोन्हीही ग्रुप तिने लग्नानंतर पूर्ण केले. रानवड येथील प्रा. रमेश वाघ, नाशिकमधील सनदी लेखापाल संतोष कासार, कैलास गोडसे, प्रा. रतन गोडसे यांचे मार्गदर्शन लाभल्याचे तिने सांगितले.

सासू-सासर्‍यांकडून अभ्यासाची मोकळीक

लग्न झाले म्हणून शिक्षण बंद करायचे नाही. निश्चित केलेले ध्येय गाठायचे असे ठरवून सोनाली यांनी अभ्यास सुरुच ठेवला. तीचे माहेर आणि सासरची दोन्ही कुटुंबे शेतकरीच आहेत. पती गणेश इंजिनियर असल्याने त्यांनी शिक्षणाचे महत्त्व सोनाली यांना पटवून दिले. सोनाली यांच्यातील गुणांना वाव देत सासू-सासर्‍यांनीही अभ्यासाची मोकळीक देताना उच्चशिक्षित होण्याचा संदेश दिला.

एस.वाय.बी.कॉम.ला असताना उराशी बाळगलेल्या सीए बनण्याच्या स्वप्नाच्या दृष्टीने सोनाली यांनी अभ्यासाला सुरुवात केली. शेतात काम करताना अभ्यासाकडे कधी दुर्लक्ष केले नाही. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, हे वाचनात आलेले होते. त्याप्रमाणे शिक्षणाकडे लक्ष दिले. कुटुंबानेही त्यांना नेहमीच प्रोत्साहन दिले.

मुलीला शिकवणं सोपे पण सुनेला…

एम.कॉम.ला असताना त्यांचे गणेश यांच्यासोबत लग्न झाले. एका मुलीला शिकवणे सोपे आहे. परंतु सुनेला शिकवणे फार कठीण असते. सासरे दत्तात्रय शिवराम गोडसे, सासू रंजना दत्तात्रय गोडसे यांनी मुलीप्रमाणे त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित केले. त्यामुळे माहेर-सासर असा भेदभाव कधीही मनात आला नाही. त्यामुळे हे स्वप्न साकार करण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि शांततेने केलेला अभ्यास; त्यातही आपली चार वर्षाची मुलगी आर्वी हिने देखील आईच्या शिक्षणात मदत करीत खारीचा वाटा उचलला. लग्नागोदर इंटर व आर्टिकलशिप केली होती. फायनलचे दोन्हीही ग्रुप त्यांनी लग्नानंतर पूर्ण केले.

आजच्या युवक-युवतींनी कुठेही खचून न जाता प्रामाणिकपणे अभ्यास करावा. केलेले श्रम आणि घेतलेले कष्ट कधीही वाया जात नाहीत. यावर आपली भावना आहे. ती सर्वांनी जोपासावी. – सोनाली गोडसे

आपल्याला सनदी लेखापाल होण्यासाठी रानवड येथील प्रा. रमेश वाघ, नाशिकमधील प्रथितयश सनदी लेखापाल संतोष कासार, कैलास गोडसे, प्रा. रतन गोडसे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. आपण सीए झालो असलो तरी आपल्यासाठी आपले पती गणेश गोडसे हेच खरे चार्टर असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

खऱ्या अर्थाने गोडसे परिवारालाच नव्हे तर संपूर्ण ग्रामस्थ आणि देवळाली कॅम्पकरांना सोनालीचा अभिमान वाटत आहे. गोडसे परिवारातील पहिली महिला सीए होण्याचा सन्मानही त्यांनी प्राप्त केला आहे. महिला असूनही लग्नानंतरही ज्या जिद्दीने ही पदवी सोनाली यांनी मिळवली, याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हेही वाचा :

The post लग्नानंतरही सुरु ठेवला अभ्यास, गोडसे परिवाराची सून झाली CA appeared first on पुढारी.

Exit mobile version