Site icon

शिक्षकाचे विद्यार्थिंनीसोबत अश्लील वर्तन, नीलम गोऱ्हेंचे कारवाईचे निर्देश

नाशिक : पुढारी वृत्तसेवाजिल्ह्यातील एका निवासी आदिवासी एकलव्य विद्यालयातील शिक्षक व वसतीगृह अधिक्षकांच्या गैरप्रकाराची घटना समोर आली आहे. याबाबत महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेत आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे व पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांना संबंधितांवर तात्काळ कारवाईचे निर्देश दिले आहेत.

याबाबत उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी निर्देशीत केलेल्या लेखी निवेदनात म्हटले की, संबधीत आश्रम शाळेतील सहा विद्यार्थिंनीसोबत शिक्षकाने अश्लील वर्तन केल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये मुलींच्या तक्रारीनंतर विशाखा समिती स्थापन करण्यात आली आहे. या विशाखा समितीने सविस्तर चौकशी केली होती. याबाबत तथ्य असल्याचा निष्कर्ष काढला आहे. त्यामुळे या प्रकरणात, संबधीत शिक्षक व अधिक्षकास सेवेतून बडतर्फ करुन ‘पोक्सो’ व इतर कायद्यातील तरतुदी अंतर्गत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. यासोबतच आश्रम शाळेवर प्रशासक नेमावा. मुख्याध्यापकास निलंबित करुन त्यांची विभागीय चौकशी करावी. पीडित मुलींचे समुपदेशन करावे. त्यांचा मनोधैर्य योजनेचे प्रस्ताव तात्काळ पाठवून द्यावेत व त्यांना तातडीने आवश्यक ती सर्व मदत दिली जावी. तसेच यामधील मुलींचे शिक्षण सुरू राहिल याबाबत आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दिले आहेत. या प्रकरणात केलेल्या कार्यवाहीचा अहवालही सादर करण्याचे निर्देश उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी आदिवासी आयुक्त व पोलीस अधीक्षक यांना दिले आहेत.

अद्याप गुन्हा दाखल नाही 

आदिवासी विकास आयुक्तालयांतर्गत असलेल्या शाळेमध्ये शिक्षकाने मुलींसोबत अश्लील वर्तन केल्याने शिक्षकाला तातडीने निलंबित करण्यात आले आहे. मात्र, अद्याप त्या शिक्षकावर गुन्हा दाखल झाला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

संबधित एकलव्य स्कूलमधील कथित प्रकाराबाबत निवेदन मिळाले आहे. याबाबत शनिवारी (दि.२०) विशाखा समिती व पोलिसांकडून आवश्यक ती चौकशी करण्यात येईल. त्यात काही आढळून आल्यास गुन्ह्याची नोंद केली जाईल.

– संदीप रणदिवे, पोलीस निरीक्षक, सटाणा

हेही वाचा :

The post शिक्षकाचे विद्यार्थिंनीसोबत अश्लील वर्तन, नीलम गोऱ्हेंचे कारवाईचे निर्देश appeared first on पुढारी.

Exit mobile version