Site icon

श्री शिव महापुराण कथेत चोरी करणारी महिलांची टोळी गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पाथर्डी फाटा परिसरात झालेल्या श्री शिव महापुराण कथेत गर्दीचा फायदा घेत महिलांचे दागिने चोरणाऱ्या टोळीतील दोन महिलांना शहर पोलिसांनी अटक केली. या टोळीत अल्पवयीन मुलींचा समावेश असून, दुसऱ्या टोळीत परराज्यातील चोरट्यांचा सहभाग समोर आला आहे. मात्र ही टोळी फरार झाली आहे. दरम्यान, अटक केलेल्या संशयितांकडून ५ ते ६ चोरीचे गुन्हे उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले.

पाथर्डी गाव परिसरात दि. २१ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत पंडित प्रदीप मिश्रा यांच्या श्री शिव महापुराण कथेचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास पाच दिवसांत लाखो भाविकांनी हजेरी लावली. या गर्दीचा फायदा चोरट्यांनीही घेतला. पहिल्या दोन दिवसांत चोरट्यांनी ३५ हून अधिक महिलांच्या गळ्यातील दागिने चोरून नेले. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चोरट्यांनी या कालावधीत सुमारे किलोभर सोन्याचे दागिने चोरले. पोलिसांनी तपास केला असता, या चोऱ्या मराठवाडा व राजस्थानमधील दोन टोळ्यांनी केल्याचे उघड झाले. त्यापैकी मराठवाड्यातील टोळीतील दोन महिलांना पोलिसांनी पकडले, तर अल्पवयीन मुलगी व बाळंतीण महिलेस ताब्यात घेतले. या टोळीकडून पोलिसांनी चोरीचे काही दागिनेही हस्तगत केले. तांत्रिक विश्लेषण तसेच सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून चोरट्यांची ओळख पटवण्यात आली. तसेच परराज्यातील टोळीतील सदस्यांचाही शोध सुरू आहे. ही टोळी गर्दीच्या ठिकाणी सहभागी होत चोरी करत असल्याचे आढळले.

कथेत पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी चोरीच्या घटना घडल्या. आम्ही चोरट्यांची गुन्हा करण्याची पद्धत अभ्यासली. त्यानुसार बंदोबस्त केला. त्यामुळे चोरट्यांना पकडता आले. या टोळीकडून काही गुन्ह्यांची उकल झाली आहे. इतर चोरट्यांचा शोध सुरू आहे.

– मोनिका राऊत, पोलिस उपायुक्त, परिमंडळ दोन

हेही वाचा :

The post श्री शिव महापुराण कथेत चोरी करणारी महिलांची टोळी गजाआड appeared first on पुढारी.

Exit mobile version