Site icon

सस्पेन्स, धाकधूक कायम! हेमंत गोडसे मुख्यमंत्र्यांच्या दारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दोन वेळा प्रबळ मताधिक्क्याने निवडून येऊनदेखील उमेदवारी मिळविण्यात अद्यापपर्यंत अपयशी ठरलेल्या खासदार हेमंत गोडसे यांनी पुन्हा एकदा पक्षाचे सर्वोच्च नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या ठाणे येथील शुभ-दीप निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत नाशिकची जागा शिवसेनेकडेच राहणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार गोडसे यांना दिल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याविषयी कोणताही खुलासा केला नसल्याने खासदार गोडसे यांची धाकधूक कायम आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानासमोर दोन वेळा शक्तिप्रदर्शन करूनदेखील उमेदवारी मिळविण्यात अपयशी ठरलेल्या खासदार गोडसे यांनी पुन्हा एकदा उमेदवारीसाठी जोर लावण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांपूर्वी खासदार श्रीकांत शिंदे यांची कल्याण येथे भेट घेतल्यानंतर रविवारी (दि. १४) त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत ‘नाशिकची जागा आपल्याकडेच राहील’, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी खासदार गोडसे यांना दिल्याची माहिती समोर येत आहे. मात्र नाशिकच्या जागेची घोषणा नक्की कधी होणार? ही जागा कुणाला सुटणार? याबाबत मुख्यमंत्र्यांनी कुठलेही स्पष्टीकरण दिले नसल्याने, उमेदवार कोण असणार? हा सस्पेन्स कायम आहे. दरम्यान, शिवसेना शिंदे गटाकडून जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, उबाठा गटाचे नाराज नेते विजय करंजकर यांची नावे समोर आल्याने, खासदार हेमंत गोडसे यांची अस्वस्थता वाढली आहे. याशिवाय राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मंत्री छगन भुजबळ, भाजपकडून आमदार राहुल ढिकले यांची नावेही उमेदवारीसाठी चर्चेत आहेत.

मविआचा उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचत असताना, आपण मागे पडत असल्याची बाब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर त्यांनी दोन ते तीन दिवसांत तिढा सुटेल, असे सांगितले. पण नाशिकची जागा कोणत्या पक्षाकडे असेल?, उमेदवार कोण असेल? याविषयी मात्र काहीही स्पष्ट सांगितले नाही. दोन ते तीन दिवसांत नाशिकसह राज्यात तिढा निर्माण झालेल्या इतर जागांवर निर्णय होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. – हेमंत गोडसे, खासदार.

हेही वाचा:

The post सस्पेन्स, धाकधूक कायम! हेमंत गोडसे मुख्यमंत्र्यांच्या दारी appeared first on पुढारी.

Exit mobile version