Nashik Lasalgaon : मुलीच्या प्रकरणातून तरुणाचे अपहरण, चार तासांत चौघे जेरबंद

लासलगावी तरुणाचे अपहरण,www.pudhari.news

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा

सिन्नर येथील अपहरणाची घटना ताजी असताना आज सकाळी लासलगाव बसस्थानकातून मुलीच्या प्रकरणातून एका तरुणाचे ओमिनी व्हॅनमधून अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली. बसस्थानकातील सीसीटीव्हीच्या मदतीने चार तासांत लासलगाव पोलिसांना अपहरणाचा तपास लावत चौघांना ताब्यात घेतले, तर तीन जण फरार झाले आहेत.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आठ जानेवारीला रविवारी निफाड तालुक्यातील देवगाव फाटा येथे मुलीच्या प्रकरणावरून मुलीचे नातेवाईक अनिल माळी याने गणेश सोनवणे याला मारहाण केली होती. या मारहाणीचा वचपा काढण्यासाठी गणेश सोनवणे याने अनिल माळीला कविता नामक मुलीचा मोबाइल नंबर असल्याचे भासवत व्हॉट्सअपवर तीन दिवस मेसेज केले. आज सकाळी लासलगाव बसस्थानकावर अनिल माळीला भेटण्यासाठी बोलवले. अनिल माळी व त्याचा मित्र दुचाकीवरून येताच बसस्थानकाच्या आवारात उभे असताना अनिल माळी याला ओमिनी व्हॅन (एमएच ०२ एव्ही १९०६)मधून अपहरण करत लासलगाव रेल्वे गेटजवळील साईनगर येथे काटेरी झुडपात उतरविले. तेथे माळीला जबर मारहाण करण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलिसांना घटनास्थळी दाखल होत बसस्थानकावरील सीसीटीव्ही कॉमेऱ्याच्या मदतीने घटनेचा तपास सुरू केला. अवघ्या चार तासांत या घटनेचा तपास लावत गणेश सोनवणे, सौरभ ठाकरे, विशाल पवार, विठ्ठल गवळी यांना ताब्यात घेतले. रवींद्र पवार, शंकर माळी व विठ्ठल गवळी हे अद्यापही फरार आहेत. लासलगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ, सहायक पोलिस उपनिरीक्षक मारुती सुरासे, पोलिस कर्मचारी प्रदीप आजगे, कैलास महाजन, योगेश शिंदे तपास करीत आहेत.

हेही वाचा :

The post Nashik Lasalgaon : मुलीच्या प्रकरणातून तरुणाचे अपहरण, चार तासांत चौघे जेरबंद appeared first on पुढारी.