जळगाव : जिल्हा बँक अध्यक्ष संजय पवार राष्ट्रवादीतून बडतर्फ

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी एका पत्राच्या माध्यमातून संजय पवार यांना बडतर्फ करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी आज मंत्री गिरीश महाजन यांना वर्तमानपत्रातील जाहिरातीच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या होत्या. यात त्यांनी शरद पवार आणि अजित पवार यांचा फोटो वापरला होता. यासोबत त्यांनी शरद पवार यांचा मोदींसोबत तर अजित पवार यांचा देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यासोबत फोटो टाकला होता. या प्रकाराची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने गंभीर दखल घेत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

पक्षाविरोधात बंडखोरी…

संजय पवार यांनी जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बंडखोरी करून राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव केला होता. तसेच धरणगाव बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी प्रणित सहकार पॅनलच्या वतीने निवडणूक लढवित असल्याचे बॅनर्स व पोस्टर्स लावले होते. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-संजय पवार गट अशा प्रकारचा उल्लेख केला होता. त्यामुळे पक्षाचे राज्य सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत संजय पवार यांना पक्षातून बडतर्फ केले आहे.

The post जळगाव : जिल्हा बँक अध्यक्ष संजय पवार राष्ट्रवादीतून बडतर्फ appeared first on पुढारी.